उभयपक्षी तोफा धडाडण्यास सुरुवात; महाराष्ट्रातही केंद्राप्रमाणे एकाधिकारशाही सेनेचा आरोप

‘महाराष्ट्रात शिवसेना यापुढे स्वबळावर भगवा फडकवेल’ अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तरीही राज्य सरकारला सध्या तरी कोणताही धोका नाही. युती संपुष्टात आली असली तरी शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले असले तरी उभयपक्षी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. ‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मोदी पॅटर्न’ सुरू असून कोणालाही विश्वासात घेतले जात नसल्याने ही कसली पारदर्शकता आणि सिंचन गैरव्यवहारांच्या चौकशीचे काय झाले, असे सवाल करीत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी टीकास्त्र सोडले आहे. तर महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबद्दल पुढील आठवडय़ात ‘काळीपत्रिका’ जारी करणार असल्याचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जाहीर केले.

शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केल्याने मुंबई, ठाण्यात काय होणार आणि सरकारमध्ये भांडणे वाढणार, यामुळे काही भाजप नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाजपला बाजूला ठेवून मुंबई-ठाण्यात शिवसेनेने स्वबळावर किंवा अन्य पक्ष व अपक्षांची मदत घेऊन सत्ता मिळविली तर सरकारच्या स्थिरतेला काही काळानंतर फटका बसेल, भांडणे वाढतील. कल्याण-डोंबिवलीप्रमाणे शिवसेनेला भाजपची मदत घ्यावी लागली तर सरकारला कोणताही धोका नाही. महापालिकेत सत्ता मिळविल्यास निकालानंतर शिवसेनेला महत्त्वाची खाती मिळावीत, यासाठीही दबाव आणला जाईल. शिवसेना सत्तेत असूनही विरोधक म्हणून काम करीत असताना त्यांच्या विरोधाची धार आता वाढणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मेट्रो प्रकल्प यासह अनेक प्रश्नांवर शिवसेना भाजपची कोंडी करणार आहे. रोजच्या भांडणांना कंटाळून नवीन पर्यायाचाही विचार त्यांना योग्य वेळी करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

‘शिवसेनेचे मंत्री बॅगा भरून तयार आहेत, पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार काम करू’, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी निवडणुकीसाठी युती तुटल्यानंतर सांगितले. तर ‘राजीनामा खिशात घेऊनच फिरतो’, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले. शिवसेना प्रवक्ते व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला असून सरकारच्या कारभारात पारदर्शकता नसल्याची टीका केली आहे.

भाजपही शिवसेनेला प्रत्युत्तर देणार

शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची  जबाबदारी भाजप नेते किरीट सोमय्या व आशीष शेलार हे सांभाळतात. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे हे नेते काही दिवस शांत राहिले असले तरी युती तुटल्याने आक्रमक झाले आहेत. महापालिकेतील नाले, कचरा, रस्त्यांच्या कंत्राटांमधील गैरव्यवहार चव्हाटय़ावर आणण्यासाठी पुढील आठवडय़ात ‘काळी पत्रिका’ काढणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. शिवसेनेला ‘त्याच जागी, त्याच वेळी’ प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने गोरेगाव येथील एनएससी मैदानावर ‘विजय संकल्प’ मेळावा आयोजित केला आहे.