डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा ‘राज्यकर्ते व्हा’ हा संदेश प्रमाण मानत दलित समाजाला राज्यकर्त्याच्या भूमिकेत नेऊ पाहणाऱ्या आंबेडकरी चळवळीतल्या पक्षांनी यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वेगवेगळ्या चुली मांडण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या सत्तास्पर्धेत मुंबईतली दलित मत विभागली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये तीन चतुर्थांश दलित मतदार असूनही त्यांचा निर्णायक परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटतेय.

यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये रामदास आठवलेंची रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया भाजपबरोबर असणार आहे. तर प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना कुठल्याही मोठ्या पक्षांबरोबर न जाता डाव्या पक्षांसोबत पुढे जाणार आहे. जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी ने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

या सगळ्या गटातटांचा नेहमीप्रमाणे फटका बसत दलित मतं विभागली जाण्याची शक्यता आहे. सेना- भाजपमधली युती तुटल्याने आता मुंबईतली महापालिका निवडणूक चौरंगी होणार आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट एकत्र येत त्यांनी दलित व्होट बँकेचं अस्तित्व दाखवून देणं शक्य होतं. पण या बदललेल्या परिस्थितीतही हे गट एकत्र यायचं नाव घेत नसल्याने ही शक्यता धूसर वाटतेय.

विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात चंचूप्रवेश केलेल्या एमआयएम ने मुंबईत पहिल्यांदाच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे मुंबईतली मुस्लिम मतं फुटून काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच एमआयएम ने आता जय भीमचा नारा दिलाय. त्यामुळे दलित मतांवरही एमआयएमचा डोळा आहे.

मुंबईच्या वरळी, नायगाव, चेंबूर, गोवंडी, मालाड, चारकोप, कांदिवली, मालाड, विक्रोऴी, कांजूरमार्ग, जोगेश्वरी, दहिसर (पूर्व), कुलाबा इथे बौध्द, चर्मकार, मातंग समाजातला मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. ही मते या गटा-तटांत विभागणार आहे. या पक्षांना निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हावर उभे राहावे लागणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराला उमेदवारासोबत चिन्हाचाही प्रचार करावा लागणार आहे. विभागणारी मते सर्वच गटातल्या उमेदवारांच्या पारड्यात पडणार आहेत. त्यामुळे याचा फायदा कोणत्याही एका गटाला होईल ही शक्यता धूसर आहे.