मवाळ किंवा सौम्य प्रकृतीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक कार्यशैली व हिंदूत्वाकडे वळले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र युती तुटल्याने शिवसेनेवर घणाघाती हल्ला करताना सावध भूमिका घेऊन उद्धव यांच्यावर थेट टीका करणे टाळले आहे. मुंबईच्या निवडणुकीची एकहाती धुरा मुख्यमंत्र्यांवर असल्याने ते सध्या सावध असून, ते टप्प्याटप्प्याने टीकेची धार वाढवतील, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिकेची लढाई अटीतटीची असून शिवसेनेकडून सत्ता हिसकावून घेऊन भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी सर्व ताकद पणाला लावत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडे सत्ता राखण्यासाठी ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्यांचा माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल, त्यांनी खुशाल पक्ष सोडावा, असा परखड इशारा ठाकरे यांनी दिला. पण पक्ष सोडणाऱ्यांना शिवसेना स्टाइलने भररस्त्यात कायदा न जुमानता बदडून काढा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसेना कार्यकर्त्यांना बंडखोरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश जाहीरपणे दिले होते. त्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यम व अन्य माध्यमांतून प्रसारित करण्यात आली आहे. शिवसेना व उद्धव ठाकरे यांचे प्रसिद्धीप्रमुख हर्षल प्रधान हे दररोज भाजपवर हल्ला चढविणारे मुद्दे व मजकूर आक्रमकपणे प्रसारमाध्यम, पोस्टर्स व अन्य माध्यमांतून पसरवीत आहेत.  अटीतटीची निवडणूकजिंकण्यासाठी शिवसेनेची मूळची आक्रमक कार्यपद्धती काही प्रमाणात तरी अमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रचाराची धुरा प्रामुख्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा हे नेते राज्यात प्रचाराला येणार नाहीत. काही केंद्रीय मंत्री येणार आहेत. त्यामुळे राज्यातील भाजपच्या मंत्र्यांवरच त्यांच्या विभागातील सर्व धुरा आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक व उत्तर महाराष्ट्र, चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, गिरीश बापट यांच्याकडे पुणे, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणची  जबाबदारी आहे. मुंबईत विनोद तावडे व प्रकाश मेहता यांच्यावर जबाबदारी असली तरी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापेक्षाही फडणवीस हेच सर्व धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे युती तुटल्यावर शिवसेनेवर हल्ला चढविताना उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीकास्त्र त्यांनी टाळले. ठाकरे किंवा खासदार संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर वैयक्तिक हल्लाही करीत असताना फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना उद्धव यांना थेट लक्ष करणे टाळले.

  • शिवसेना मराठी माणसाच्या मुद्दय़ावर लढली. पण आता या भूमिकेत बदल करण्यात आला असून गुजराती व अन्य भाषिकांनाही शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच वेळी उद्धव यांनी आक्रमक हिंदुत्व मांडण्यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येते किंवा काय प्रतिसाद उमटतात, ते पाहून टीकेची धार वाढविण्याची मुख्यमंत्र्यांची रणनीती आहे.