केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्पात मुंबई लोकलसेवेसाठी ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. मुंबईत ९० किलोमीटरचे रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच लोकलसेवेचे जाळेही विस्तारले जाणार आहे. रेल्वे स्थानके आणि लोकलच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

उपनगरीय रेल्वेचे जाळे १५० कि.मी.च्या पट्ट्यात वाढवले जाणार आहे, त्यासाठी ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असेही जेटलींनी जाहीर केले. तसेच अनेक स्टेशन्सवर सरकते जिने आणि वायफाय लावण्यात येणार असल्याचेही जेटली यांनी जाहीर केले. देशभरातील रेल्वेसाठी एकूण १.४८ लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. रेल्वेच्या तिकिट दरांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या सगळ्या घोषणांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. मुंबई लोकलसेवेचे जाळे वाढविण्यासाठी ४० हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. केंद्राचा हा निर्णय ऐतिहासिक आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबई लोकलसेवेसाठी एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. या निधीमुळे मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल सेवेचा दर्जा सुधारेल. सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे मी आभार मानतो असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पियुष गोयल हे मुंबईचे आहेत त्यामुळेच मुंबईची लाइफलाइनसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे