Anand Mahindra on Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभा निवडणुकीआधी काल संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतेही मोठे आश्वासन देण्यात आले नाही. कररचनेतही कोणताही बदल केला गेला नाही. या अर्थसंकल्पानंतर महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी ‘आनंद’ व्यक्त केला. त्यांचे मते हा अर्थसंकल्प देशाच्या वित्तीय गरजांचे व्यवस्थापन आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी मदतगार ठरेल.

कोणतेही नाट्य नाही, ही कौतुकाची बाब

आनंद महिंद्रा यांनी आपल्या एक्स अकाऊंवर एक दीर्घ पोस्ट टाकून अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. “अर्थसंकल्प सादर होत असताना त्याच्याभोवती अनेक नाट्यमय घडामोडी घडताना मी अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे. मात्र यावेळी तसा नाटकीपणा घडला नाही. धोरणांची घोषणा होत असताना लोकांच्या आशा पल्लवीत होताना पाहिल्या, मात्र कधी कधी पूर्ण न होणारे आश्वासने दिली गेल्याचेही आपण पाहिले. धोरणांची घोषणा करण्यासाठी अर्थसंकल्प नसतो. अशा घोषणा वर्षभरात कधीही करता येऊ शकतात”, अशी प्रतिक्रिया आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली.

अर्थसंकल्पावर मी खूश असल्याचे आनंद महिंद्रा म्हणाले, यासाठी त्यांनी चार प्रमुख कारणे दिली आहेत.

  • पहिले कारण म्हणजे अर्थसंकल्प थोडक्यात सादर करण्यात आला. भाषण अजिबात लांबविले गेले नाही. भाषण संक्षिप्त ठेवल्याबद्दल स्वागत आहे. (अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५८ मिनिटांत अंतरिम अर्थसंकल्पाचे भाषण संपविले होते)
  • दुसरे कारण म्हणजे, निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात येत असतात. मात्र या अर्थसंकल्पात अशा घोषणा करण्यात आल्या नाहीत. याचे मी स्वागत करतो आणि हीच बाब पुढेही कायम राहील, अशी आशा करतो.
  • तिसरी बाब म्हणजे, राजकोषीय तुटीचे लक्ष्य अपेक्षेपेक्षा चांगले आहे. सरकारच्या दूरदर्शी (Prudence) धोरणाचा हा विजय आहे.
  • चौथे कारण म्हणजे, कर आणि शुल्काबाबत कोणतेही मोठे बदल करण्यात आले नाहीत. यामुळे बाजारात जेवढी स्थिरता राहील, तेवडा व्यवसायांना लाभ होईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग सहावा अर्थसंकल्प सादर केला. त्यांचा आतापर्यंतचा सर्वात कमी वेळात मांडलेला हा अर्थसंकल्प होता. २०२० साली त्यांनी दोन तास ४० मिनिटं एवढं लांबलचक भाषण केलं होतं.