Budget 2022: गेल्या ६ महिन्यांपासून चर्चत राहिलेल्या एअर इंडिया मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया अखेर २७ जानेवारी रोजी पूर्ण झाली. यानंतर एअर इंडियाची मालकी ६७ वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटा समूहाकडे गेली. हा सौदा १८ हजार कोटींना झाला असला, तरी त्याच्या थकित कर्जाती तब्बल ५२ हजार कोटींची रक्कम अद्याप प्रलंबित होती. अखेर ही रक्कम फेडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प २०२२ सादर करताना घोषणा केली.
खर्चाच्या सुधारित अंदाजामध्ये रक्कम समाविष्ट
स्पेशल पर्पज वेहिकलकडे ट्रान्सफर केलेलं एअर इंडियाचं तब्बल ५१ हजार ९७१ कोटींचं कर्ज चुकतं करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील अंदाजित भांडवली खर्चाच्या सुधारित अंदाजामध्ये हा खर्च समाविष्ट करण्यात आला होता. त्यासाठी या अर्थसंकल्पात आता तरतूद करण्यात आली आहे.
Budget : स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प
भांडवली खर्च ६ लाख ३ हजार कोटी
“२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी एकूण अंदाजित खर्च ३४.८३ लाख कोटी इतका नमूद करण्यात आला होता. त्यासाठी सुधारित अंदाज आता ३७ लाख ७० हजार कोटी इतका अंदाजित करण्यात आला आहे. या रकमेमध्ये भांडवली खर्च ६ लाख ३ हजार कोटी इतका असेल. यात एअर इंडियाच्या थकित कर्जापोटी द्यावयाच्या ५१ हजार ९७१ कोटी रुपयांच्या रकमेचा देखील समावेश आहे”, अशी माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना दिली.
स्टेट बँक ऑफ इंडियाचं टाटा सन्सला दीर्घकालीन कर्ज
टाटा समूह आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार २७ जानेवारी रोजी एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे हस्तांतरीत करण्यात आली. १८ हजार कोटींना हा सौदा झाला असून त्यातील १५ हजार ३०० कोटी एवढी कर्जाची रक्कम आहे. उर्वरीत २ हजार ७०० कोटी रुपये रोखीने केंद्र सरकारला देण्यात आले आहेत. कर्जाची रक्कम फेडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं टाटा सन्सला दीर्घकालीन कर्ज देऊ केलं आहे.