Budget 2024 Date and Time in India : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) पुन्हा एकदा देशात बहुमत मिळवून सत्तास्थापन केली आहे. मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत. तसेच त्यांच्याबरोबर इतर ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून सर्व मंत्र्यांमध्ये खातेवाटपही पूर्ण झालं आहे. दरम्यान, आता सर्वांना नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करू शकतात. अर्थमंत्री १ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काही वेळापूर्वी एक निवेदन जारी केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, १८ व्या लोकसभेचं पहिलं सत्र येत्या २४ जूनपासून सुरू होईल. पहिलं अधिवेशन सुरू होताच सर्वप्रथम निवडून आलेल्या सर्व लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाईल. तसेच लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये ही महत्त्वाची कामं उरकली जातील.

सर्व नवीन खासदारांचा शपथविधी आणि लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. तसेच पुढील पाच वर्षांसाठी नव्या सरकारचा संकल्प सादर करतील.

दरम्यान, किरण रिजिजू यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, १८ व्या लोकसभेचं पहिलं सत्र २४ जूनपासून सुरू होईल, जे ३ जुलैपर्यंत चालेल. या सत्रात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि त्यावर चर्चा घडवून आणली जाईल. तसेच राज्यसभेचं २६४ वं सत्र २७ जूनपासून सुरू होईल. राज्यसभेचं सत्र देखील लोकसभेबरोबर ३ जुलै रोजी समाप्त होईल. राज्यसभेत २७ जून रोजी राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळाची सर्व सदस्यांशी ओळख करून देतील.

हे ही वाचा >> अर्थसंकल्प २०२४ : सरकार नील अर्थव्यवस्थेला देणार प्रोत्साहन; नील अर्थव्यवस्था म्हणजे काय? भारतासाठी किती महत्त्वाची?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्मला सीतारामण मोरारजी देसाईंचा विक्रम मोडणार

अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामण यांचा हा सातवा अर्थसंकल्प असेल. यापूर्वी त्यांनी पाच पूर्ण आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामण यांच्याआधी भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. देसाई यांचा हा विक्रम आता सीतारामण मोडणार आहेत. सीतारामण यांनी यावर्षी १ फेब्रुवारी रोजी या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणूक होऊन नवं सरकार आल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा असून मोदींचं नवं सरकार ही परंपरा पुढे नेत आहे.