India Budget 2025 Updates : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रे स्थापन करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट एआय संशोधन, विकास आणि नवोपक्रमाला चालना देणे आहे, ज्यामुळे भारताला जागतिक एआय तंत्रज्ञानात क्षेत्रात स्थान मिळेल. याचबरोबर सरकार उद्योग, स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांना पाठिंबा देण्यासाठी प्रगत एआय हब स्थापन करण्याची योजना आखत आहे. यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेषणात आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये तीन एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केली होती. या सेंटर्सचे उद्दिष्ट आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देणे आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रगत एआय प्रयोगांच्या विकासाला चालना देणे आहे. दरम्यान नुकतेच चीनमधील एका कंपनीने DeepSeek नावाचे एआय तंत्रज्ञान विकसीत केले आहे. त्याची सध्या जगभरात चर्चा आहे. त्यादृष्टीने आज अर्थसंकल्पातील घोषणा भारताचे सावध पाऊल मानले जात आहे.

अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान बोलताना सीतारमण म्हणाल्या, “मी २०२३ मध्ये शेती, आरोग्य आणि शाश्वत शहरांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेतील तीन उत्कृष्टता केंद्रांची घोषणा केली होती. आता, शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेतील उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाईल ज्याचा एकूण खर्च ५०० कोटी रुपये असेल.”

यावेळी सीतारमण यांनी पाच राष्ट्रीय कौशल्य केंद्रे (National Centers of Excellence for Skilling) स्थापन करण्याची योजना असल्याचे देखील सांगितले आहे. ही योजना तरुणांना उद्योगाशी संबंधित कौशल्याने शिकवण्यासाठी तयार केली आहे. “मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड मॅन्युफॅक्चरिंगला पाठिंबा देण्यासाठी जागतिक भागीदारीसह ही केंद्रे स्थापन केली जातील,” असे सीतारमण म्हणाल्या. या उपक्रमात अभ्यासक्रम डिझाइन, प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण, कौशल्य प्रमाणन आणि नियमित मूल्यांकन यांचा समावेश असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, २०२५ च्या अर्थसंकल्पात दहा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, ज्यामध्ये मेक इन इंडिया आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे तसेच पुढील पाच वर्षांत विकासाला गती देण्यासाठी आणि देशाच्या समृद्धीला चालना देण्यासाठी समावेशक विकास सुनिश्चित करणे यांचा समाविष्ट आहे.