scorecardresearch

Budget 2023: “केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली”, विनायक राऊतांचं टीकास्त्र!

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

vinayak raut on union budget 2023
निर्मला सीतारामण – विनायक राऊत (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा शेवटचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पातून नेमक्या कोणत्या घोषणा केल्या जाणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा आली आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. तसेच भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतंही विधान केलं नाही, असंही राऊत म्हणाले. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा- इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन, टीव्ही; नेमकं काय स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना विनायक राऊत म्हणाले, “हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे काही प्रमाणात सवलती देण्याचा प्रयत्न केला असला तरी एक घोर निराशा खासकरून मुंबईकरांच्या पदरी आली आहे. मुंबईत सातत्याने पंतप्रधान मोदी यांचं येणं-जाणं वाढलं असल्यामुळे मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल, असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करताना शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याचं यापूर्वी सूचित केलं होतं. शेतकऱ्यांच्या दुप्पट झालेल्या उत्पन्नाला योग्य तो बाजारभाव देण्यासाठी ठोस उपाय योजना करायला हवी होती, ती केली गेली नाही.”

हेही वाचा- “डायमंड हब सुरतला दिलं, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल!

“पाच वर्षापूर्वीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात येत्या पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत जाईल, असं जाहीर केलं होतं. यावेळी मात्र त्यांनी जाणुनबुजून उच्चार केला नाही. आता अदाणीमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने घसरत आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे ५ ट्रिलिअनचा टप्पा नेमका किती गाठला? हे सांगण्याकडे अर्थमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं. तसेच जीएसटी करदात्यांना अनेक प्रकारे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, जीएसटी सेक्शन १६/४ मध्ये ज्या जाचक अटी आहेत, यामुळे लघु व्यापाऱ्याला खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय, त्यावर योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता होती, संबंधित उपाययोजना या अर्थसंकल्पात केल्या नाहीत,” अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

मराठीतील सर्व Budget 2023 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 14:41 IST

संबंधित बातम्या