पीटीआय, नवी दिल्ली

थेट विक्री क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी ‘ॲम्वे इंडिया’ने मल्टी लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) म्हणजे बहुस्तर साखळी धाटणीच्या व्यवसायाद्वारे ४,००० कोटी रुपयांहून अधिक मोठ्या रकमेची लुबाडणूक केली गेली आणि त्यातील ७० टक्के रक्कम परदेशी बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली गेली, असे आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात आहेत.

लाभांश, स्वामित्व हक्क (रॉयल्टी) आणि इतर खर्चाच्या पूर्ततेच्या नावाखाली सदस्यांकडून गोळा केलेले २,८५९ कोटींहून अधिक रुपये परदेशी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात वळते केले गेले, असे तपास यंत्रणेने ॲम्वेविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. फिर्यादीची आर्थिक गैरव्यवहारासंबंधीची तक्रार हैदराबादमधील विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ज्याची सोमवारी त्याची दखल घेतली, असे ईडीने सांगितले. कंपनी वस्तूंच्या विक्रीच्या नावाखाली बेकायदेशीर ‘मनी सर्क्युलेशन स्कीम’ चालवत होती आणि भरमसाट लाभ आणि प्रोत्साहन भत्त्याचे आमिष दाखवून विक्रेता सदस्यांची नोंदणी करून, कंपनीकडून प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेची फसवणूक सुरू होती, असा न्यायालयात दाखल तक्रारीचा दावा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाव शतकांपूर्वी भारतात कार्यारंभ झालेल्या कंपनीने यावर प्रतिक्रिया देताना, कंपनी सर्व कायद्यांचे पालन करत असल्याचा दावा केला. ईडीने दाखल केलेले आरोपपत्र आणि फिर्यादीची तक्रार २०११ सालातील तपासाशी संबंधित आहे आणि तेव्हापासून तपास यंत्रणांना सहकार्य आणि वेळोवेळी मागितलेली सर्व माहिती कंपनीने दिली आहे, असे ॲम्वेच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या प्रकरणी ईडीने ७५७ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्तही केली आहे.