पीटीआय, नवी दिल्ली

अमेरिकेतील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (डीएफसी) श्रीलंकेतील कोलंबो येथील बंदराच्या विकासासाठी ५५.३ कोटी डॉलरचा वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेच्या वित्तसंस्थेच्या माध्यमातून गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह विकसित करत असलेल्या या प्रकल्पासाठी हा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे.

अमेरिकी वित्तसंस्था इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून कोलंबोमधील ‘डीपवॉटर वेस्ट कंटेनर टर्मिनल’च्या विकासासाठी होऊ घातलेली ही आशियातील सर्वात मोठी पायाभूत गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे ‘हिंडेनबर्ग’ अहवालातील आरोपांमुळे मोठे नुकसान सोसाव्या लागणाऱ्या अदानी समूहाला दिलासा मिळणार आहे. याचबरोबर दिवाळखोर आणि कर्जजर्जर झालेल्या श्रीलंकेच्या आर्थिक विकासालादेखील चालना मिळणार आहे.

आणखी वाचा-भारतीय अर्थव्यवस्थेची आगेकूच कायम – एस अँड पी

चीनने गेल्या वर्षाच्या अखेरीस श्रीलंकेमध्ये सुमारे २.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. श्रीलंकेचा सर्वात मोठा परदेशी थेट गुंतवणूकदार चीनच आहे. हा चीनच्या मुत्सद्देगिरीचा एक भाग म्हणून रचला जात असलेला कर्ज-सापळा, असेही म्हटले जात आहे. कारण गेल्या काही वर्षांत चीनने पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी कर्ज आणि इतर प्रकारची आर्थिक मदत देऊन श्रीलंकेत प्रवेश मिळविला आहे. हिंद महासागरातील हंबनटोटा बंदर हे मोक्याचे ठिकाण आहे. त्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला आहे. मात्र कर्जाची वेळेत परतफेड न करता आल्याने चीनने ते बंदर ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर ताब्यात घेतले आहे.

कोलंबो हे बंदर हिंद महासागरातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या जवळ असल्यामुळे सर्व कंटेनर जहाजांपैकी जवळजवळ निम्मी जहाजे तिथून मार्गक्रमण करतात. आता अदानी समूहातील आघाडीची कंपनी असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडसोबत काम करणार असल्याचे अमेरिकी वित्तसंस्था डीएफसीने स्पष्ट केले.

आणखी वाचा-भारतातील एफडीआय वाढणार; आगामी काळात सकारात्मक चित्र दिसण्याचा अंदाज

‘डीएफसी’ काय आहे?

तत्कालीन अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली डीएफसी ही विकास वित्तसंस्था आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांची उद्दिष्टे साध्य करण्यासोबत विकसनशील राष्ट्रांना मदत करण्यासाठी ती स्थापन करण्यात आली आहे.