पीटीआय, नवी दिल्ली : बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत विस्तार फैलावलेल्या अदानी समूहातील प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने २५,००० कोटी रुपयांची निधी उभारण्याची योजना आखली आहे. मंगळवारी पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत भागधारकांना हक्कभाग (राइट्स इश्यू) विक्रीच्या माध्यमातून या निधी उभारणीला मान्यता देण्यात आली.

संपूर्ण नियामक आवश्यकतांचे पालन केल्यांनतर हक्कभाग विक्रीसाठी ‘रेकॉर्ड तारीख’ निश्चित करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. या हक्कभाग विक्रीतून मिळणारा निधी पायाभूत सुविधा उपक्रमांमध्ये आणि कंपनीच्या विस्तार मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. याआधी जुलै महिन्यात अदानी एंटरप्राइजेसने १,००० कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय रोख्यांची विक्री केली होती. त्याला गुंतवणूकदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. या रोख्यांसाठी अवघ्या तीन तासांत १०० टक्के भरणा झाला होता.

त्याआधी जानेवारी २०२३ मध्ये अदानी एंटरप्राइजेसने ‘एफपीओ’द्वारे समभागांची विक्री करून २०,००० कोटी रुपयांची निधी उभारणीची घोषणा केली होती. ही देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी समभाग विक्री होती. मात्र हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील अनियमितता आणि लबाड्यांच्या आरोपांनी अदानी समूहातील समभागांची मोठी वाताहात झाली होती. हे पाहता प्रतिकूल बाजार परिस्थितीचे कारण सांगत कंपनीने ‘एफपीओ’मध्ये भरणा पूर्ण होऊनही, त्यातून माघारीची घोषणा केली होती.

नुकत्याच सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ७१ टक्के वाढ झाली असून, तो ३,४१४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने १,९८९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. मंगळवारच्या सत्रात अदानी एंटरप्राइजेसचा समभाग १.९१ टक्क्यांनी घसरून २,४१९.८० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, कंपनीचे २.७९ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.