मुंबई: जागतिक पतमानांकन संस्था मूडीजने अदानी समूहातील चार कंपन्यांसंबंधी दृष्टिकोन ‘स्थिर’वरून ‘नकारात्मक’ केल्याचे पडसाद म्हणून, समूहातील बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग सोमवारच्या सत्रातही घसरले. प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसमध्ये सर्वाधिक ७ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. 

शुक्रवारी बाजारातील व्यवहार आटोपल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनाद्वारे, मूडीज इन्व्हेस्टर सव्‍‌र्हिसने अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर बाजार मूल्यात तीव्र घसरण अनुभवणाऱ्या अदानी समूहाला आणखी एक धक्का मानांकनात बदलाचा निर्णय जाहीर केला. सोमवारी त्यावर गुंतवणुकदारांच्या नकारार्थी प्रतिक्रिया उमटल्या आणि संपूर्ण सत्रात अदानी समूहाच्या समभागांवर दबाव होता. त्याचबरोबर निर्देशांक सेवा प्रदात्या ‘एमएससीआय’ने अदानी समूहातील चार कंपन्यांचे भारांक कमी करण्याच्या ठरविल्याने या समभागांमध्येही विक्रीचे पडसाद उमटले. ‘एमएससीआय’ने अदानी एंटरप्राइजेस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, एसीसीस सिमेंटच्या भारांकात कपात केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवसभरात, गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम करणाऱ्या समूहासाठी नकारात्मक बातम्यांचा प्रवाह सुरूच होता, ज्यात समूहाने महसूल वाढीच्या लक्ष्यात मोठी कपात केल्याचे वृत्तही पुढे आले. अदानी समूहाच्या १० कंपन्यांच्या समभागांनी २४ जानेवारीपासून आजपर्यंत सुमारे १०.२ लाख कोटी रुपये किंवा त्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात सुमारे ५३ टक्के नुकसान सोसले आहे, असे ‘स्टॉक्सबॉक्स’चे संशोधन प्रमुख मनीष चौधरी यांनी सांगितले.