नवी दिल्ली :खासगी क्षेत्रातील अग्रणी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने मुंबईत नवीन युगाच्या ‘५ जी’ सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकसंख्येने दहा लाखांचा टप्पा ओलंडला आहे. सध्या कंपनीने ठरावीक शहरांमध्ये ‘५ जी’सेवेला सुरुवात केली आहे, त्यापैकी मुंबई पहिले शहर होते, असे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अदानींकडून अमेरिकी कंपनीला १५,४४६ कोटी रुपयांचे समभाग विक्री

एअरटेलने गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळूरु, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथे मर्यादित स्वरूपात ‘५ जी’ची सेवा सुरू केली होती. देशभरात एअरटेलच्या ‘५ जी प्लस’ सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्येने अलीकडेच १ कोटींचा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२२ ला ‘५ जी’च्या अनावरणाची घोषणा केल्यानंतर खासगी क्षेत्रातील भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने सेवेला सुरुवात केली होती. एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी टप्प्याटप्प्याने विविध शहरांमध्ये सेवा विस्तारणार आहे. तर मार्च २०२४ च्या अखेरीस देशातील प्रत्येक शहरात आणि ग्रामीण भागात ‘५ जी प्लस’ विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मुंबईमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहक आमच्या ‘५ जी प्लस’ नेटवर्कचा लाभ घेत आहेत. अगदी कमी कालावधीत ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे, असे भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभोर गुप्ता म्हणाले.

एअरटेलचे ‘५ जी प्लस’ सध्या मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, फिल्म सिटी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, घाटकोपर आणि अंधेरीचे मुंबई मेट्रो जंक्शन, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस यासह अनेक महत्त्वाच्या स्थानांवर कार्यान्वित आहे.

हेही वाचा >>> रिलायन्स कॅपिटलचा आता फेरलिलाव; कंपनीच्या कर्जदात्या गटाला ‘एनसीएलएटी’ची परवानगी

गेल्या वर्षी १ ऑगस्टला संपलेल्या दूरसंचार ध्वनिलहरींच्या लिलावात विक्रमी दीड लाख कोटी रुपयांची बोली लावली गेली. जिओसह, भारती एअरटेल, व्होडा-आयडिया या तीन मुख्य स्पर्धकांसह अदानी डेटा नेटवर्क्स या कंपनीने या लिलावात सहभाग घेतला होता.

दरवाढ शक्य भारती एअरटेलने नवीन कॅलेंडर वर्षात (२०२३) सर्व प्रकारच्या मोबाइल फोन कॉल आणि डेटा दरात वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात २८ दिवसांचा वैधता असलेल्या किमान रिचार्ज योजनेत सुमारे ५७ टक्क्यांची वाढ केली असून तो आता आठ मंडळात १५५ रुपयांवर नेला आहे. कंपनीचा ताळेबंद निरोगी असताना दरवाढीची गरज असल्याबद्दल कंपनीने अध्यक्ष सुनील भारती मित्तल म्हणाले की, दूरसंचार व्यवसायातील भांडवलावरील परतावा खूपच कमी आहे, त्यामुळे दरवाढ करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel 5g users in mumbai airtel 5g subscribers in mumbai crosses 1 million zws
First published on: 03-03-2023 at 09:46 IST