मुंबईः देशाचे औषध निर्माण केंद्र असलेल्या हैदराबादच्या थिम्मापूर ते न्हावाशेवा, जेएनपीए बंदरापर्यंत देशातील पहिली समर्पित रीफर रेल्वे मालवाहतूक सेवा डीपी वर्ल्डने, ओशन नेटवर्क एक्सप्रेस अर्थात ‘वन’च्या सहकार्याने सुरू केली आहे. प्रशीतन आणि तापमान-नियंत्रण प्रणाली असणारी (रीफर) ही रेल्वे मालवाहतूक असल्याने ती या प्रदेशातील औषध निर्यातदारांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे.
रस्त्यावरून रेल्वेपर्यंतचे हे संक्रमण असून, ही सेवा स्थिर तापमान राखून, निर्यातीसाठी सज्ज कंटेनर जहाजांपर्यंत एकात्मिकपणे जोडलेली आहे. त्यामुळे औषध निर्यात पुरवठा साखळी मजबूत होण्यासह, औषध उत्पादनांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ही एक महत्त्वाची सुविधा ठरेल, असे कंपनीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या नवीन साप्ताहिक सेवेद्वारे एकाच रेल्वे गाडीतून ४३ फूट कंटेनर वाहून नेले जाऊ शकते. मासिक चार वेळा सुरू राहणाऱ्या या सेवेद्वारे, डीपी वर्ल्ड १७२ पेक्षा जास्त कंटेनर रस्त्यावरून रेल्वे वाहतुकीकडे स्थानांतरित करणार आहे. ज्यामुळे रस्त्यावरील दररोज सुमारे ४३ ट्रकइतकी गर्दी कमी होऊ शकेल.
मालवाहतुकीसाठी रेल्वेच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन आणि हवेचे प्रदूषण देखील कमी होते आणि औषध निर्माण व्यवसायांसाठी अधिक शाश्वत मॉडेल ते प्रस्तुत करते. शिवाय रस्त्यावरील रहदारीच्या विलंबाचे धोके कमी होतात आणि वेळेवर जहाज कनेक्शन शक्य होते. रेल्वे-सागरी वाहतुकीचे एकीकरण निर्यातदारांसाठी कार्यक्षमता सुधारण्यास मदतकारक आणि जागतिक व्यापारात भारताचे स्थान कसे मजबूत करणारे ठरेल, असाही कंपनीचा दावा आहे.
प्रत्येक कंटेनरला डीपी वर्ल्डच्या मालकीच्या पॉवरपॅकद्वारे मदत मिळते. ते संपूर्ण प्रवासात अचूक तापमान राखतात आणि स्थैर्य राखून त्याची क्षमता आणि प्रभाव कायम ठेवतात. मानवी कौशल्य आणि डिजिटल वापर एकत्र आल्याने कार्गो अखंडता आणि सुरक्षितता कायम राहते. तसेच समर्पित तंत्रज्ञ प्रत्येक ट्रेनसोबत असतात आणि रिअल टाइममध्ये परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी ग्राउंड टीमशी डिजिटली जोडलेले असतात.
डीपी वर्ल्ड ही देशातील सर्वात मोठ्या खासगी रेल्वे मालवाहतूक सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. त्यात आठ इनलँड रेल्वे टर्मिनल, १०० हून अधिक मालकीचे कंटेनर रेक, एसएफटीओ रेक आणि १६,००० हून अधिक कंटेनर आणि ट्रेलर कंपनीच्या ताफ्यात आहेत. जलद, स्वच्छ आणि अधिक विश्वासार्ह पुरवठा साखळीचे पर्याय त्यातून खुले झाले आहेत. एकात्मिक गोदाम आणि डिजिटल देखरेख प्रणालींसह एकत्रित केलेली ही मालमत्ता, डीपी वर्ल्डला हैदराबाद आणि न्हावा शेवा दरम्यान दोन्ही दिशांना तापमान-नियंत्रित मालवाहतुकीची गरज असलेल्या औषध निर्माण, नाशवंत वस्तू, शेतमाल प्रक्रियादार यांना सहाय्यभूत ठरेल.