मुंबई: वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) कमी दर लागू झाल्यामुळे, बाजारात सर्वाधिक खपाच्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मात्या (एफएमसीजी) कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या कमी केलेल्या किमती निश्चित करताना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. परंतु या उचित आणि ग्राहकांसाठी लोभस व सोयीस्कर ठरणाऱ्या किंमत बिंदूला गाठण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागण्याची अपेक्षा आहे.
एफएमसीजी कंपन्यांनी जीएसटी कपातीनंतर त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. तथापि त्यापश्चात २ रुपये, ५ रुपये आणि १० रुपये असलेल्या विक्री किमतीचे ताजे रूप खूपच विचित्र आणि खरेदीदारांना त्यासाठी पैसे चुकते करणे जिकीरीचे ठरेल, असे बनले आहे. मुख्यत: छोट्या सॅशे स्वरूपात रूळलेली बिस्किटे, कँडी, शाम्पू आणि मसाले यासारखी विविध नित्यपयोगी उत्पादने ही मध्यमवर्गीय आणि ग्रामीण ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.
तथापि जीएसटी कपातीपश्चात, पारले जी बिस्किटांचा छोटा पॅक, ज्याची किंमत पूर्वी ५ रुपये होती, आता ४ रुपये ४५ पैसे झाली आहे आणि २ रुपये किमतीच्या शाम्पू सॅशेची किंमत आता १.७५ रुपये करण्यात आली आहे. सुट्या पैशांची चणचण असलेल्या भागांत, तसेच ग्राहकांसाठी हा किमत स्तर गैरसोयीचाच ठरेल.
यावर उपाय म्हणून उत्पादनांचे पॅकेज नव्याने पुनर्मुद्रित करून, कमी कर दरांचे फायदे ग्राहकांना मिळवून देण्यासाठी कमी किंमतीसह अथवा वजनाने अधिक असलेले उत्पादनाचे पॅक कंपन्यांकडून प्रस्तुत केले जातील. मात्र हे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे.
उद्योग क्षेत्रातील तज्ञांच्या मते, ‘जीएसटी’ कपात मात्रेनुसार, २२ सप्टेंबरपासून ठरेल ती किंमत स्वीकारण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. ताबडतोबीचा उपाय म्हणून, सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी लोकप्रिय उत्पादनांच्या आणि प्रचलित असलेल्या पॅकची कमाल विक्री किंमत (एमआरपी) कमी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
होय, ही १०० टक्के तात्पुरती व्यवस्था आहे. साधारणपणे, कोणत्याही उत्पादनाच्या पॅकचे वजन आणि किमत पट्टीतील बदलासारख्या गोष्टींसाठी सुमारे दीड ते दोन महिने लागत असतात. सामान्यतः दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत ही प्रक्रिया कंपन्या पूर्ण करतात, असे पार्ले प्रोडक्ट्सचे उपाध्यक्ष मयांक शहा यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.
सध्या, पारले जी बिस्किटांच्या पॅकची किंमत जी पूर्वी ५ रुपये होती, आता जीएसटी फायदे लागू झाल्यानंतर ते आता ४.४५ रुपयांना विकले जात आहे. डाबरसह सर्वच एफएमसीजी कंपन्यांनी देखील त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत असेच अपूर्णांकांत मोडतील असे बदल केले आहेत.