लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : जागतिक पातळीवरील आव्हानात्मक वातावरणातही देशाची अर्थव्यवस्था वेगाने मार्गक्रमण करत आहे. या आशावादाने प्रेरित होऊन परदेशी गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशांतर्गत भांडवली बाजारामध्ये २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

डिपॉझिटरीजने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) शेअर बाजारात सुमारे २.०८ लाख कोटी रुपये आणि रोखे बाजारात १.२ लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. त्यांनी एकत्रितपणे, भांडवली बाजारात ३.४ लाख कोटी रुपये ओतले आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये भारतीय भांडवली बाजाराकडे पाठ फिरवल्यानंतर आर्थिक वर्ष २०२३-२४ दमदार पुनरागमन केले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, जागतिक पातळीवर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आक्रमक दर वाढ केल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारातून नक्त ३७,६३२ कोटी रुपये माघारी घेतले होते. त्याआधीच्या वर्षात १.४ लाख कोटी रुपये काढले. मात्र, २०२०-२०२१ मध्ये, परदेशी गुंतवणूकदारांनी २.७४ लाख कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली होती.

हेही वाचा >>>गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

परदेशी गुंतवणूकदारांकडून येणारा प्रवाह हा विकसित बाजारपेठेतील चलनवाढ आणि व्याजदर परिस्थितीवर अवलंबून असून यामध्ये मुख्यतः अमेरिका आणि इंग्लंड आघाडीवर आहेत. एकंदरीत, परदेशी गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून सकारात्मक सुरुवात केली आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या आशादायी मार्गक्रमणामुळे ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीचा कल कायम होता. या पाच महिन्यांत त्यांनी १.६२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर, परदेशी गुंतवणूकदार सप्टेंबरमध्ये निव्वळ विक्रेते बनले आणि ऑक्टोबरमध्येही मंदीची स्थिती कायम राहिली आणि या दोन महिन्यांत ३९,००० कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली होती. मात्र नोव्हेंबरमध्ये ते निव्वळ गुंतवणूकदार बनले आणि डिसेंबरमध्येही त्यांनी ६६,१३५ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले मात्र जानेवारीत पुन्हा त्यांनी २५,७४३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

शिवाय सप्टेंबर २०२३ मध्ये, जेपी मॉर्गनने त्यांच्या बेंचमार्क इमर्जिंग मार्केट निर्देशांकात भारत सरकारच्या रोख्यांचा जून २०२४ पासून समावेश करण्याची घोषणा केली. नियोजित केलेल्या या महत्त्वाच्या समावेशामुळे येत्या १८ महिने ते २४ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २० अब्ज ते ४० अब्ज डॉलर गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. या प्रवाहामुळे भारतीय रोखे परदेशी गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ होतील आणि रुपयाला संभाव्य बळकटी मिळेल, असे मत मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे हिमांशू श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.