मुंबई : आखाती देशांमधील वाढता तणाव आणि जागतिक भांडवली बाजारातील कमकुवत कलामुळे देशांतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी १ टक्क्यांहून अधिक आपटले.

गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८२३.१६ अंशांनी म्हणजेच १ टक्क्यांनी घसरून ८१,६९१.९८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ९९१.९८ गमावत ८१,५२३.१६ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २५३.२० अंशांची (१.०१ टक्के) घसरण झाली आणि तो २५,००० अंशांच्या पातळीखाली २४,८८८.२० वर बंद झाला.

देशांतर्गत आघाडीवर समभागांच्या वाढत्या मूल्यांकनाची चिंता आणि आखाती देशांमधील तणावामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली. जोखीम टाळण्याच्या प्रयत्न परिणामी समभाग विक्री सुरू झाली. अनेक प्रमुख व्यापारी भागीदारांवर एकतर्फी करवाढ करण्याचा अमेरिका विचार करत असल्याने जागतिक अनिश्चितेत भर घातली आहे. जुलैच्या सुरुवातीला निर्धारीत अंतिम मुदतीपूर्वी म्हणजेच पुढील एक ते दोन आठवड्यात याबाबत निर्णय अपेक्षित आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा झाल्याने भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात दिवसभर नकारात्मक वातावरण होते. सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, टाटा मोटर्स, टायटन, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, महिंद्र अँड महिंद्र आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे समभाग सर्वाधिक घसरले. तर गुरुवारच्या सत्रातील बाजार पडझडीत बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्र यांची कामगिरी चमकदार राहिली.

सेन्सेक्स ८१,६९१.९८ -८२३.१६ -१%

निफ्टी २४,८८८.२० -२५३.२० -१.१%

तेल ६८.७७ -१.४३ टक्के

डॉलर ८५.६० ७ पैसे