मुंबई: एकात्मिक लॉजिस्टिक्स सेवा प्रदात्या ग्लॉटिस लिमिटेडने बुधवारी तिच्या प्रस्तावित ३०७ कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) प्रति समभाग १२० रुपये ते १२९ रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केल्याची घोषणा केली. ही विक्री २९ सप्टेंबरला गुंतवणुकीसाठी खुली होईल आणि १ ऑक्टोबर रोजी बंद होईल.

चेन्नईस्थित या कंपनीचा गोदामे (वेअरहाऊसिंग), सागरी मालवाहतूक, हवाई मालवाहतूक आणि सीमाशुल्क समाशोधन अशा व्यवसायात कार्यरत असून, जगभरात नौकावहन सेवा, वाहतूकदार, कस्टम्स एजंट यांचा समावेश असलेल्या २५६ सहयोगी संस्थांच्या माध्यमातून ती १२५ देशांत सेवा देते. भारतात ही कंपनी नवी दिल्ली, गांधीधाम, कोलकाता, मुंबई, तुतीकोरिन, कोइम्बतूर, बेंगळुरू आणि कोचीन येथील आठ शाखा कार्यालयांच्या जाळ्याद्वारे आणि स्वमालकीच्या १७ वाहनांच्या ताफ्याच्या माध्यमातून सेवा देते. प्रस्तावित आयपीओतून मिळणारा निधी १५० वाणिज्य वाहने आणि कंटेनर खरेदी करण्यासाठी तसेच कर्जफेडीसाठी कंपनीकडून वापरला जाईल.

ग्लॉटिसचे वैशिष्ट्य म्हणजे तिने सौर वीज पुरवठा साखळी उपायांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अक्षय्य ऊर्जा, अभियांत्रिकी उत्पादने, ग्रॅनाइट आणि खनिजे, गृह उपकरणे, लाकूड – प्लायवूड, कृषी, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहने रसायने, कापड, बांधकाम, वैद्यकीय आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांसह अनेक उद्योगांमधील ग्राहकांना कंपनी सेवा देते.

पँटोमॅथ कॅपिटल ॲडव्हायझर्स ही या भागविक्रीची एकमेव व्यवस्थापक आहे. ग्लॉटिसचे समभाग मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध केले जाणार असून, याची संभाव्य तारीख ७ ऑक्टोबर असू शकेल. वैयक्तिक छोट्या गुंतवणूकदारांना किमान ११४ समभागांसाठी, त्यानंतर ११४ समभागांच्या पटीत बोली लावून या आयपीओमध्ये सहभागी होता येईल.

कंपनीचा महसूल ३१ मार्च २०२५ अखेर ९४१ कोटी रुपये असून, वार्षिक तुलनेत त्यात ८० टक्के वाढ झाली आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा २०२४-२५ अखेर ५६ कोटी रुपये आहे. पीएम कुसुम, पीएम गतीशक्ती, सागरमाला अशा योजनांच्या माध्यमातून सरकारचे धोरणात्मक पाठबळ हे ग्लॉटिसच्या आगामी काळातील उच्च गतीने वाढीस पूरक घटक आहेत, असे कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक रामकुमार सेंथिवेल म्हणाले. विशेषतः २०२५ ते २०३० दरम्यान सौर ऊर्जा क्षेत्राच्या स्थापित क्षमतेत वार्षिक सरासरी २३.५ टक्के दराने होऊ घातलेली वाढ ही ग्लॉटिसच्या व्यवसायवाढीचा आधार ठरेल, असे ते म्हणाले.