मुंबई: काजू किंवा नारळाच्या रसापासून बनवली जाणारी गोव्याची प्रसिद्ध फेणी, नाशिकची वाइन अथवा केरळाची ताडी हे पारंपरिक मद्य प्रकार लवकरच लंडनच्या प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या प्रदर्शनीय फडताळांवर मानाची जागा मिळविताना दिसून येतील. मोठा वारसा असूनही कुटिरोद्योगांत मोडणाऱ्या भारतातील या अद्वितीय पेयांना ब्रिटनमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता ही उभय देशांमध्ये होऊ घातलेल्या मुक्त व्यापार करारामुळे निर्माण झाली आहे.
या मूळ भारतीय पेयांना केवळ त्यांचे पारंपारिक भौगोलिक संकेत (जीआय) चिन्हासह संरक्षण मिळेल इतकेच नाही तर विकसित बाजारपेठांमध्ये देखील त्यांच्या प्रवेशाचा मार्ग यातून खुला होईल. विशेषतः पाश्चिमात्य राष्ट्रात नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात या उत्पादनांना लक्षणीय मागणी राहण्याची शक्यता आहे.
ब्रिटनशी मुक्त व्यापार करार (एफटीए) मार्गी लागल्यामुळे स्कॉच व्हिस्की आणि इतर उंची पेयांच्या बरोबरीनेच पारंपारिक भारतीय पेये ब्रिटनच्या बड्या विक्री दालनांमध्ये जागा मिळवितील, शिवाय हॉटेल, उपाहारगृहासारख्या आतिथ्य उद्योगातही प्रवेश करण्यास देखील त्यांना मदत होईल, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य
जागतिक बाजारपेठेत भारतीय अल्कोहोलिक पेये निर्यातीला प्रोत्साहन देऊ पाहत असलेल्या सरकारसाठी हे एक मोठे सुयश ठरेल. जरी देशाच्या निर्यातीसाठी हा एक नवीन विभाग असला तरी, सरकारला २०३० पर्यंत देशातील पारंपरिक मद्य पेयांची निर्यात सध्याच्या ३७०.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून १ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला, कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडाने, जागतिक बाजारपेठेत भारतीय अल्कोहोलिक पेयांच्या बाजारपेठेसाठी मोठा वाव असल्याचे म्हटले आहे. भारताकडे जगाला देण्यासाठी जिन, बिअर, वाइन आणि रम यासह विशेष चव आणि गुणवत्तेसाठी ओळख निर्माण करतील अशी अनेक चांगली उत्पादने आहेत.
भारत सध्या अल्कोहोलिक पेये निर्यातीत जगात ४० व्या क्रमांकावर आहे आणि येत्या काळात जगातील अव्वल १० निर्यातदारांमध्ये स्थान मिळवण्याचे देशाचे लक्ष्य आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाची अल्कोहोलिक पेये निर्यात २,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, नेदरलँड्स, टांझानिया, अंगोला, केनिया आणि रवांडा यांचा समावेश आहे.