पुणे : गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (जीपीएल) पुण्यात खराडी,वाघोली परिसरात १४ एकर जमीन विकसित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ही जमीन संपादित केली असून, यातून ४ हजार २०० कोटी रुपयांचा महसूल कंपनीला मिळणार आहे.गोदरेज प्रॉपर्टीजकडून या प्रकल्पात प्रामुख्याने प्रीमियम गटातील घरे उभारली जाणार आहे. या प्रकल्पाची विकासक्षम क्षमता ३७ लाख चौरस फूट असून, अंदाजे महसूल क्षमता ४ हजार २०० कोटी रुपये आहे. खराडी येथील प्रमुख व्यापारी केंद्रांजवळ ही जागा असल्याने शाळा, रुग्णालये, मॉल, रेस्टॉरंट्स तसेच मोठी हॉटेल, या परिसरात आहेत. तसेच नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळही येथून जवळ असणार आहे. पुण्यातील प्रमुख आयटी आणि बिझनेस हबपासून जवळ असल्याने खराडी, वाघोली परिसरात घरांना मागणी वाढत आहे.

याबाबत गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी गौरव पांडे म्हणाले की, खराडी आणि वाघोली हे पुण्यातील सर्वाधिक मागणी असलेले ठिकाण आहे. यामुळे पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेतील आमचे स्थान भक्कम होईल. तसेच भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती मजबूत करण्याच्या आमच्या धोरणाशी हे सुसंगत आहे. उत्तम प्रतीची घरे ग्राहकांना देणे, हे आमचे लक्ष्य आहे.