नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) तसेच अन्य अल्पबचत आणि पोस्टाच्या योजनांचे व्याजदर सध्या आहेत त्याच पातळीवर कायम राहतील, असा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केला.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेवींवर ८.२ टक्के व्याजदर मिळेल, तर पोस्टाच्या तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील दर चालू तिमाहीत ७.१ टक्के राहील.लोकप्रिय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ आणि पोस्ट ऑफिस बचत ठेव खात्यावर व्याजदर अनुक्रमे ७.१ टक्के आणि ४ टक्के प्रति वर्ष असे कायम ठेवण्यात आले आहेत.

किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.५ टक्के असेल आणि ही गुंतवणूक ११५ महिन्यांत परिपक्व होईल. एप्रिल-जून २०२५ या कालावधीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील (एनएससी) व्याजदर ७.७ टक्के राहील. चालू तिमाहीप्रमाणे, मासिक उत्पन्न योजना गुंतवणूकदारांसाठी ७.४ टक्के उत्पन्न दिले जाईल. यासह, पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर सलग पाचव्या तिमाहीत अपरिवर्तित ठेवण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पबचत योजनांचे व्याजदर हे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून दर तिमाहीला आढावा घेऊन निर्धारित केले जात असतात. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. याआधी काही योजनांमध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत शेवटचे बदल केले गेले होते.