मुंबई: सोन्याचे दर नवीन उंची गाठत असताना, जगातील सर्वात मोठ्या सराफा बाजारांपैकी एक असलेल्या भारतात सर्वसमावेश सोने धोरण तयार केले जाण्याची नितांत आवश्यकता आहे, असे स्टेट बँकेने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भारतातील सोने खरेदीला असलेले सांस्कृतिक व पारंपरिक महत्त्व पाहता हे प्राप्त परिस्थितीत गरजेचे बनले आहे.
जागतिक भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता आणि कमकुवत अमेरिकी डॉलरमुळे मौल्यवान धातूच्या किमती नवनवीन उच्चांक गाठत आहे. वर्ष २०२५ मध्ये सोन्याच्या किंमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये काही दिवस ते प्रति औंस ४,००० डॉलरच्या खाली आले होते. मात्र नोव्हेंबरमध्ये पुन्हा ते पुन्हा प्रति औंस ४,००० डॉलरच्या पुढे गेले, असे स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाच्या ‘कमिंग ऑफ (अ टर्ब्युलंट) एज : द ग्रेट ग्लोबल गोल्ड रश’ या शीर्षकाच्या अहवालात म्हटले आहे. १६ व्या वित्त आयोगाचे सदस्य आणि स्टेट बँक समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी हा अहवाल तयार केला आहे.
सध्या सोन्याबाबत सर्वसमावेशक धोरण आखण्याची वेळ आली आहे. कारण सोने म्हणजे काय (वस्तू किंवा मालमत्ता) आणि त्याचा अंतिम ग्राहक सोन्याकडे कसे पाहतो हे निर्धारित करणे महत्त्वाचे बनले आहे. सोने धोरणाच्या संदर्भात सध्याच्या कलांमध्ये मागणी कमी करण्याचे उपाय आणि उत्पादनक्षम हेतूंसाठी देशांतर्गत सध्याच्या सोन्याच्या साठ्याचा पुनर्वापर यावर भर हवा.
सोने मौल्यवान असले तरी सध्या भांडवली निर्मितीमध्ये त्याचा कोणताही वापर नाही. मात्र सोन्याच्या मुद्रीकरणामुळे भविष्यातील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल. यासाठीच सोन्याबाबत सर्वसमावेशक धोरण विकसित करण्यावर अधिक चर्चा करण्याची गरज आहे, जी व्यापक आर्थिक क्षेत्रातील सुधारणांसाठी उपयोगी ठरू शकते.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या अंदाजानुसार, देशांतर्गत स्रोतातून सोन्याचा पुरवठा हा भारतातील एकूण सोन्याच्या मागणीचा केवळ एक अंश इतका आहे. वर्ष २०२४ मध्ये भारतातील ८०२.८ टन सोन्याची मागणी नोंदवण्यात आली. जी जागतिक सोन्याच्या मागणीच्या २६ टक्के होती. चीनमधून ८१५.४ टन सोन्याची मागणी नोंदवण्यात आली. सध्याच्या अस्थिरतेमुळे गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याला वाढलेली मागणी, महागाईपासून बचाव आणि सुरक्षित मालमत्ता यासह इतर आर्थिक घटकांशी असलेले सांस्कृतिक आकर्षण यामुळे भारत हा सोन्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक म्हणून स्थान राखून आहे. हे पाहता दीर्घकालीन सुवर्ण धोरण आखण्याची हीच वेळ आहे, असे अहवालात म्हटले आहे.
सोने-रुपया नाते
देश सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे सोन्याच्या किंमतीचा थेट परिणाम भारतीय रुपयाच्या विनिमय दरावरही होतो, असे स्टेट बँकेच्या अहवालात म्हटले आहे. सोन्याच्या वाढत्या किमती भारतीय रुपयाच्या घसरणीशी संबंधित आहेत.
