नवी दिल्ली : जागतिक पातळीवर व्यापार तणाव काहीअंशी कमी झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचे भांडवली बाजारात पुनरागमन झाले आहे. विद्यमान एप्रिल महिन्यात बाजारात आलेल्या तेजीनंतर भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची संपत्ती पुन्हा १०० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, या काळात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे, त्यांची निव्वळ संपत्ती मार्च महिन्यात ८१ अब्ज डॉलरच्या नीचांकी पातळीवरून सुमारे २० अब्ज डॉलरने वाढून १०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. या वाढीमुळे त्यांना जागतिक स्तरावरील आघाडीच्या १६ धनाढ्य व्यक्तींमध्ये स्थान मिळाले आहे. सरलेल्या ४ मार्चला त्यांची संपत्ती ८१ अब्ज डॉलर होती. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या समभागांमध्ये जोरदार तेजी आली. तरीही त्यांची सध्याची एकूण संपत्ती ८ जुलै २०२४ रोजी नोंदवलेल्या १२०.८ अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे २० टक्के कमी आहे.

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्याही श्रीमंतीत भर पडली आहे. त्यांची एकूण संपत्ती १४.५ अब्ज डॉलरने वाढून ७७.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या वाढीनंतरही, एकूण संपत्ती ३ जून २०२४ रोजीच्या त्यांच्या १२०.८ अब्ज डॉलरच्या शिखरापेक्षा ५७ टक्क्यांनी कमी आहे.

सन फार्मास्युटिकलचे दिलीप संघवी आणि भारती एअरटेलचे सुनील मित्तल या दोहोंच्याही एकूण संपत्तीमध्ये मार्चच्या नीचांकी पातळीपासून अनुक्रमे ४.९ अब्ज डॉलरपेक्षा भर पडून ती अनुक्रमे २८.८ अब्ज डॉलर आणि २७.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल आणि कोटक महिंद्र बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक हे आधीच्या तोट्यातून सावरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती आता अनुक्रमे २२.८ अब्ज डॉलर आणि १६.६ अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर आहे.