मुंबई : डॉलरच्या तुलनेत गेल्या काही सत्रात नीचांकी पातळीवर घसरणाऱ्या रुपयाला बुधवारच्या सत्रात थेट ७५ पैशांचे बळ मिळाले. भांडवली बाजारातील चैतन्य आणि परकीय गुंतवणूक दारांकडून खरेदी यातून मंगळवारी सार्वकालिक नीचांक पातळीवरून चलनाने मोठी झेप घेतली.
रुपया बुधवारी ७५ पैशांनी सावरून ८८.०६ रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला. रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे आणि देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांची सरशी झाल्याने, रुपयाने चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेच्या आशावादामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात चैतन्याचे वातावरण आहे, ज्याचे पडसाद देखील रुपयाच्या वाढीवर प्रतिबिंबित झाले. जगातील इतर चलनांच्या तुलनेत कमकुवत झालेला डॉलर आणि खनिज तेलाच्या किमतीतील घसरणीमुळेही रुपयाला मोठा आधार मिळाला.
परकीय चलन बाजारात, रुपयाने ८८.७४ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रादरम्यान तो ८८ च्या खाली घसरला आणि प्रति डॉलर ८७.९३ च्या उच्चांकाला त्याने स्पर्श केला. मंगळवारच्या सत्रात तो १३ पैशांनी घसरून ८८.८१ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला होता. दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.२२ टक्क्यांनी घसरून ९८.८२ वर स्थिरावला.
अमेरिकी डॉलरमधील कमकुवतपणा आणि देशांतर्गत भांडवली बाजारातील मजबूती यामुळे रुपया सकारात्मक पातळीवर व्यापार करण्याची अपेक्षा होतीच. जागतिक खनिज तेलाच्या किमती नरमल्याने आणि नवीन परकीय आवक वाढल्याने रुपयाला आधार मिळाला. आगामी काळात रुपया ८७.७० ते ८८.४० च्या श्रेणीत व्यवहार करणे अपेक्षित आहे, असे मत मिरे ॲसेट शेअरखानचे परकीय चलन संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी व्यक्त केले.