आता तुम्ही म्हणाल जरा उशिराच जागे झाले आहात, तेसुद्धा तीन महिन्यांनंतर. मात्र हे नूतनवर्षाभिनंदन दिनदर्शिकेप्रमाणे नसून आर्थिक वर्षानुसार आहे. आम्ही अर्थ क्षेत्रातले व्यावसायिकदेखील बऱ्याचदा विसरून जातो की, नवीन वर्ष नक्की कशाला म्हणायचे? भारतात नवीन वर्ष इतक्या प्रकारची आहेत की विचारूच नका. गुढीपाडवा, उगाडी, बैसाखी, पुथन्दू, बिहू, विशू आणि ही यादी खूप मोठी आहे. ही नवीन वर्षे सूर्याच्या चालीप्रमाणे आणि त्या त्या संस्कृतीचा भाग असतात.

भारतात ईस्ट इंडिया कंपनीने प्रथा सुरू केल्यापासून आर्थिक वर्षाची १ एप्रिलपासून सुरुवात होते आणि ते ३१ मार्चला संपते. आर्थिक वर्ष बदलून १ जानेवारीला सुरू करावे आणि ३१ डिसेंबरला संपवावे याबाबत सरकार विचाराधीन आहे, अशी समाजमाध्यमांवर चर्चा सुरू होती. मात्र सरकारदरबारी त्याबाबत फारशी हालचाल झाली नाही. त्याविषयी आपण पुढील भागात बघू. जगात सर्वच देश दिनदर्शिका वापरतात म्हणजे आपल्याकडे जी तारीख असेल तीच तारीख इतर देशातदेखील असते, थोडासा वेळेचा फरक सोडला तर. पण कुतूहल म्हणून बघायला गेलो तर वित्तीय वर्ष किंवा करांचे वर्ष हे मात्र सगळ्या देशांमध्ये काही सारखे नसते. इंग्रजांनी आपल्याला आर्थिक वर्षांची संकल्पना समजावली आणि एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष म्हणून भारतात रूढ झाले. मात्र स्वतः ते ६ एप्रिल ते ५ एप्रिल हे आर्थिक वर्ष पाळतात. नेपाळमध्ये त्यांचा रीतीनुसार आर्थिक वर्ष १६ जुलैला सुरू होते आणि १५ जुलैला संपते. बहुतांश देशात आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च किंवा जानेवारी ते डिसेंबर असते.

हेही वाचा – महाबँकेच्या पहिल्या नवउद्यमी शाखेचे पुण्यामध्ये उद्घाटन

हेही वाच – क.. कमॉडिटीचा : कृषीवायदे : इंडोनेशियाचा भारताला धडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराण आणि अफगाणिस्तान देशांमध्ये सोलर हेजरीप्रमाणे आर्थिक वर्ष सुरू होते व संपते. ते २१ किंवा २२ मार्चला सुरू होऊन पुढील वर्षी संपते. अफगाणिस्तानमध्ये २०११ मध्ये यामध्ये बदल करून ते २१ डिसेंबर ते २० डिसेंबर असे करण्यात आले. सिंगापूरमध्ये तर तुमचे आर्थिक वर्ष तुम्हालाच ठरवण्याची मुभा कंपन्यांना देण्यात आली आहे. मात्र सरकारचे आर्थिक वर्ष दैनंदिनीप्रमाणेच होते. पाकिस्तानमध्येसुद्धा कंपन्यांना त्यांचे आर्थिक वर्ष ठरवण्याची मुभा आहे, पण सरकारी आर्थिक वर्ष १ जुलैपासून ३० जूनपर्यंत असते. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशमध्येदेखील सारखीच प्रणाली आहे. प्रत्येक देशाचे नियम वेगळे आणि रंजक आहेत. सर्व भारतीयांना पुन्हा एकदा नूतनवर्षाभिनंदन!