पुणे: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांकडून व्याजदर कपातीचे सत्र सुरू झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र (महाबँक) आणि युनियन बँकेने कर्जाच्या दरात थेट अर्धा टक्का कपात गुरुवारी जाहीर केली.
महाबँकेने गृह, मोटार, शिक्षण यासह रेपो दरांशी संलग्न अन्य कर्ज योजनांच्या व्याजदरात अर्धा टक्का कपात केली आहे. याबाबत बँकेने म्हटले आहे की, व्याज दरातील कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा दाखवून देत आहोत. व्याजदराच्या सध्याच्या स्थितीत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बँकेने आपली किरकोळ कर्जे स्वस्त दराने देऊ केली आहेत. सध्या महाबँकेकडून गृह कर्ज ७.३५ टक्क्यांपासून आणि वाहन कर्ज ७.७० टक्क्यांपासून दिले जाते.
याबरोबर युनियन बँकेने बाह्य मानदंडावर आधारित (ईबीएलआर) आणि रेपो दराशी निगडित कर्ज दर (आरएलएलआर) अर्ध्या टक्क्यांनी कमी केला आहे. या निर्णयासह, युनियन बॅंकेने त्यांचे ईबीएलआर आणि आरएलएलआर पूर्णपणे रिझर्व्ह बँकेने केलेल्या अलीकडील दर कपातीशी जुळवून घेतले आहेत, जे नवीन आणि विद्यमान किरकोळ (घर, वाहन, वैयक्तिक) आणि एमएसएमई कर्जदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असे बँकेने सांगितले.