मुंबई : अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात २५ आधारबिंदूच्या (पाव टक्का) अपेक्षित कपातीनंतर, या वर्षी आणखी दोन व्याजदर कपातीची शक्यता दर्शविल्याचे जगभरात उमटलेल्या तेजीमय प्रतिबिंबाने भारताच्या बाजारालाही गुरुवारी मोहिनी घातली. शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजीची मालिका सुरू राहून, प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ३२० अंशांनी वाढून ८३,००० च्या वर जाऊन स्थिरावला.

भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी मध्यरात्री, अमेरिकी ‘फेड’ने २०२५ सालातील पहिल्या व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला. या पाव टक्का कपातीतून तेथील व्याजदर ४ ते ४.२५ टक्क्यांच्या श्रेणीत खालावले आहेत. वाढत्या महागाई दर आणि थंडावलेली नवीन रोजगार निर्मिती पाहता, हे कपात चालू वर्षात आणखी दोनदा शक्य असल्याचे संकेत अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी दिले. गेल्या वर्षी देखील सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान सलग कपातीनंतर फेडने जानेवारी २०२५ पासून कपात चक्र थांबविले होते.

गुरुवारी सकाळी याचे अपेक्षित स्वागत भारतीय बाजाराने केले. सकाळीच मोठ्या वाढीसह खुल्या झालेला बीएसई सेन्सेक्स, दिवसअखेर ३२०.२५ अंशांनी अर्थात ०.३९ टक्क्यांची वाढ साधून ८३,०१३.९६ वर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४४७.५ अंशांची कमाई करत ८३,१४१.२१ असा अडीच महिन्यांपूर्वी मागे सोडलेला उच्चांक दाखविला होता. दुसरीकडे एनएसई निफ्टी निर्देशांक ९३.३५ अंशांनी अर्थात ०.३७ टक्क्यांनी वाढून २५,४२३.६० वर बंद झाला.

भारताच्या शेअर बाजाराने गती कायम राखली असून, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून अपेक्षेप्रमाणे व्याजदर कपात झाल्यानंतर आता भारत-अमेरिका व्यापार चर्चेचे पुनरुज्जीवन आणि अनुकूल परिणामांच्या आशेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत गेला आहे. ‘फेड’ व्याजदर कपातीचा परिणाम म्हणजे भारतात परकीय गुंतवणुकीचा प्रवाह मजबूत होणे अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे देशांतर्गत गुंतवणुकीचा दमदार प्रवाह, चलन स्थिरता आणि अनुकूल भू-राजकीय स्थिती ही बाजारासाठी नजीकच्या काळात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करतील, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. बुधवारी या निर्णयाच्या अपेक्षेमुळे, सेन्सेक्स ३१३.०२ अंशांनी वाढून ८२,६९३.७१ वर स्थिरावला होता, तर निफ्टी ९१.१५ अंशांनी वाढून २५,३३०.२५ वर बंद झाला होता.

गेल्या काही सत्रांपासून सलग वाढीची मालिका इटर्नलच्या शेअरने कायम ठेवली. सेन्सेक्समधील, सन फार्मा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, आयटीसी आणि अदानी पोर्ट्स हे अन्य प्रमुख शेअर वाढले. तर टाटा मोटर्स, ट्रेंट, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स हे शेअर घसरणीच्या यादीत होते.

आशियाई बाजारपेठेत चीन वगळता, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक वधारला. मात्र शांघायचा एसएसई कम्पोझिट निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँग सेंग १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला. युरोपमधील बाजारपेठाही लक्षणीय वाढीसह खुल्या झाल्या, तर बुधवारी अमेरिकन बाजारपेठांमध्ये संमिश्र हालचाल दिसून आली.