मुंबई : आघाडीचा बाजार मंच असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईच्या भागधारकांची संख्या एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे. सर्वाधिक भागधारक असलेल्या असूचिबद्ध कंपन्यांपैकी ती आघाडीची कंपनी ठरली आहे. बहुप्रतीक्षित एनएसईच्या प्रारंभिक समभाग विक्रीकडे (आयपीओ) गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत.
देशातील अनेक सूचिबद्ध कंपन्यांकडेदेखील एक लाख भागधारक नाहीत. याबरोबरच आघाडीचा बाजार मंच असलेल्या एनएसईचा नफ्याच्या बाबतीत देशातील आघाडीच्या २५ कंपन्यांमध्ये समावेश होतो. बाजार मंचाच्या माहितीनुसार, सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्ये कंपनीला १२,१८८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४७ टक्क्यांहून अधिक आहे. एनएसईच्या भागधारकांमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी, जीआयसी, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इन्शुरन्ससारख्या विमा कंपन्यांचा समावेश आहे. स्टेट बँकेचाही एनएसईमध्ये ३.२३ टक्के हिस्सा आहे.
एनएसईमध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, क्राउन कॅपिटल, एमएस स्ट्रॅटेजिक (मॉरिशस), टीआयएमएफ होल्डिंग्ज, टीए एशिया पॅसिफिक ॲक्विझिशन्स आणि अरंडा इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस) प्रा. लि. यासह अनेक परदेशी भागधारकांचा समावेश आहे. याशिवाय, ३१ मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत एक्स्चेंजच्या भागधारक संख्येनुसार, सुमारे ३४,००० किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल शेअरहोल्डर्स) म्हणजेच ज्यांच्याकडे प्रत्येकी २ लाख रुपयांपर्यंत मूल्याचे समभाग आहेत.
आयपीओ प्रतीक्षेत
आठ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या आयपीओसाठी विविध नियामक आणि वैधानिक मंजुरीची वाट पाहत असतानाही एनएसईच्या भागधारकांची संख्या सातत्याने वाढते आहे. एनएसईने डिसेंबर २०१६ मध्ये भांडवली बाजार नियामक सेबीकडे मसुदा प्रस्ताव सादर केला होता. असूचिबद्ध कंपन्यांमध्ये सर्वाधिक सक्रियपणे समभाग खरेदी-विक्री होणाऱ्यांपैकी एनएसई एक आहे. विद्यमान वर्षात सर्व नियामक आणि वैधानिक मंजुरी पूर्ण करून एनएसई आयपीओ आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.