मुंबई: देशातील बँकांच्या ठेवीतील वाढ मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मंदावून १०.६ टक्क्यांवर आली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात ही वाढ १३ टक्के होती, ही बाब रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँकांच्या ठेवींमधील वाढ मंदावली असली तरी एकूण ठेवींचे प्रमाण भक्कम आहे.

यंदा मार्चअखेरीस एकूण ठेवींमध्ये मुदत ठेवींचे प्रमाण सर्वाधिक असून, ते ५९.५ टक्के आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात हे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा किंचित कमी होते. एकूण ठेवींमध्ये बचत ठेवींचे प्रमाण मार्च २०२५ अखेरीस २९.१ टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण त्याआधी मार्च २०२३ अखेरीस ३३ टक्के आणि मार्च २०२४ अखेरीस ३०.८ टक्के होते. चालू खात्यातील ठेवींचे प्रमाण मात्र ९.८ टक्क्यांवर कायम राहिले आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील काही वर्षांत ग्राहकांचा कल मुदत ठेवींकडे वाढत आहे. कारण यावरील व्याजदर अधिक असल्याने जास्तीत जास्त ग्राहक यामध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देत आहेत. यंदा मार्चअखेरीस मुदत ठेवींपैकी ६४.८ ठेवी या एक ते तीन वर्षे मुदतीच्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे या ठेवींपैकी ७२.७ टक्के ठेवींवर बँकांकडून ७ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक व्याजदर दिला जात आहे. याचवेळी मुदत ठेवींपैकी ४५.१ टक्के ठेवी या एक कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या आहेत. बँकांच्या ग्रामीण शाखांपेक्षा शहरी शाखांमध्ये ठेवींत वाढीचे प्रमाण अधिक आहे.