पुणे : जागतिक पातळीवर अनिश्चितता वाढत असतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती भक्कम आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था इतरांमध्ये वेगळे स्थान निर्माण करू शकली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केले.

महाबँकेच्या (बँक ऑफ महाराष्ट्र) ९१ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या. या वेळी वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना उपस्थित होते. या वेळी सीतारामन म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवरील अनिश्चिततेत मोठी वाढ होत आहे. त्याचा परिणाम सर्वच देशांवर होताना दिसून येत आहे. या अनिश्चिततेच्या वातावरणातही भारताची अर्थव्यवस्था आपले वेगळे स्थान कायम ठेवू शकली. आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती भक्कम आहे. देशातील मोठ्या प्रमाणातील तरुण लोकसंख्या, देशांतर्गत मागणीवरील अवलंबित्व यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे.

भारताचे सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर एप्रिल ते जून तिमाहीत ७.८ टक्के नोंदविण्यात आला. यामुळे आव्हानात्मक स्थितीतही भारताचे अर्थव्यवस्थेची सकारात्मक वाटचाल सुरू असल्याचे दिसते. हे अपघाताने घडलेले नाही. गेल्या दशकभरात सरकारची वित्तीय धोरणे, पतधोरण, महत्त्वाच्या रचनात्मक सुधारणा, पायाभूत सुविधांवर भर, प्रशासनातील सुधारणा आणि स्पर्धात्मकतेत वाढ या गोष्टींचा चांगला परिणाम आज आपल्यासमोर आहे, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

या वेळी नागराजू म्हणाले की, सार्वजनिक बँकांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर (एमएसएमई) अधिकाधिक भर द्यायला हवा. त्यांनी एमएसएमई उद्योगांना अधिकाधिक कर्जे वितरित करावीत. याचबरोबर शैक्षणिक कर्जांनाही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. कोणतेही शैक्षणिक कर्ज नाकारले जाणार नाही, याची काळजी बँकांनी घ्यायला हवी. याचबरोबर कृषी आणि इतर संलग्न क्षेत्रांत बँकांनी कर्ज वितरणात वाढ करावी. यातून बँकेची प्रगती साध्य होणार असून, देशाच्या प्रगतीलाही हातभार लागणार आहे.

महाबँकेचे बाणेरमध्ये प्रशासकीय कार्यालय

महाबँकेचे लोकमंगल हे मुख्यालय शिवाजीनगर भागात आहे. या मुख्यालयाची इमारत जुनी झाली आहे. बँकेच्या वाढलेल्या कर्मचारी संख्येमुळे ही जागा अपुरी पडत होती. त्यामुळे आता बँकेने बाणेर भागातील माँटक्लेअरमध्ये नवीन प्रशासकीय कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. याचबरोबर बँकेने झेनलाइफ हे उपयोजन (ॲप्लिकेशन) सुरू केले आहे. बँकेने देशभरात पुढील दीड वर्षांत ३२१ शाखा सुरू करण्याचे नियोजन केले आहे.