पीटीआय, नवी दिल्ली

सोन्याच्या भावाने दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी उच्चांकाची गुढी उभारली. सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅमला ३५० रुपयांची वाढ होऊन तो ७१ हजार ७०० रुपये या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचला. यंदा सोन्याच्या भावात एकूण ७ हजार ७०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून गुंवतणूकदार सोन्याकडे वळत असल्याने भावाने उसळी घेतली आहे. दिल्लीत सोन्याच्या भावात आज प्रति १० ग्रॅमला ३५० रुपयांची वाढ होऊन तो ७१ हजार ७०० रुपयांवर पोहोचला. मागील सत्रात सोन्याचा भाव ७१ हजार ३५० रुपये होता. चांदीचा भावात प्रतिकिलो ८०० रुपयांची वाढ होऊन तो ८४ हजार रुपयांवर पोहोचला. चांदीच्या भावानेही आज उच्चांकी पातळी गाठली. चालू वर्षात सोन्याच्या भावातील तेजी कायम राहिली आहे. यंदा सोन्याच्या भावात आतापर्यंत ७ हजार ७०० रुपयांची वाढ झाली आहे.

हेही वाचा >>>प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर

याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले की, दिल्लीत सोन्याच्या वायद्यांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. जागतिक पातळीवरील तेजीमुळे सोन्याच्या भावाने उसळी घेतल्याचे दिसून आले. जागतिक धातू वायदे मंच कॉमेक्सवर सोन्याचा भाव प्रतिऔंस ७ डॉलरने वधारून २ हजार ३३६ डॉलरवर पोहोचला. अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी चांगली असूनही व्यापाऱ्यांनी त्याकडे लक्ष न देता सोन्यातील गुंतवणूक कायम ठेवली आहे. मागील काही आठवड्यांपासून सोन्याच्या भावाची आगेकूच सुरू आहे. त्यामुळे आता भावाने सार्वकालिक उच्चांक गाठला आहे.

जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी सुरू असल्याने भावात वाढ होत आहे. भूराजकीय तणाव आणि व्याजदर कपातीची शक्यता असल्याने गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. सोन्याचे भाव आठवडाभरात ६९ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.- जतीन त्रिवेदी, विश्लेषक, एलकेपी सिक्युरिटीज