मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर घसरलेल्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप केल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मध्यवर्ती बँकेने बुधवारी रुपयाला आधार देण्यासाठी ३ ते ५ अब्ज डॉलर स्पॉट आणि नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड मार्केटमध्ये विक्री केल्याचा अंदाज आहे.
खासगी, सरकारी आणि परदेशी बँकांमधील सात व्यापाऱ्यांच्या मते, रिझर्व्ह बँकेने अंदाजे ५ अब्ज डॉलरची खर्ची घातले आहेत. नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड बाजारात लक्षणीय उलाढाल सुरू असल्याचे दिसून आले. रिझर्व्ह बँकेकडून अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, तथापि तिच्या या संभाव्य हस्तक्षेपांमुळे बुधवारी रुपया विक्रमी नीचांकातून डोके वर काढून, चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला. गुरुवारीही रुपयातील तेजी कायम राहिली आणि भारतीय चलन प्रत्येक अमेरिकी डॉलरमागे ८७.७० च्या उच्चांकावर पोहोचले.
मध्यवर्ती बँकेने हस्तक्षेप करण्यापूर्वी, रुपयाने ८८.८१ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर मंगळवारी लोळण घेतली होती. मात्र बुधवारी ७३ पैसे, तर गुरुवारच्या सत्रात रुपया २१ पैशांनी वधारून ८७.८७ या पातळीवर स्थिरावला आहे. म्हणजेच दोन दिवसांत त्याचे डॉलरच्या बदल्यात विनिमय मूल्य ९४ पैशांनी सुधारले आहे.
इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकी चलनाची मंदी आणि गुंतवणूकदारांमध्ये जोखीम घेण्याची भावना यामुळे रुपयाला बळ मिळाले आहे. गुरुवारी रुपयाने ८८ च्या खाली म्हणजेच ८७.७६ पातळीवर व्यवहाराला सुरुवात केली आणि प्रति डॉलर ८७.६८ या दिवसांतर्गत उच्चांकाला स्पर्श केला. दिवसअखेर मागील बंदच्या तुलनेत २१ पैशांनी वाढ त्याने नोंदवली.
बुधवारी, रुपया ७३ पैशांनी वधारून, ८८.०८ वर बंद झाला होता. नजीकच्या काळात, रुपयाला ८७.६० ही आधार तर ८८.७० ही प्रतिकार पातळी असल्याचे दर्शवत आहे. दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.२१ टक्क्यांनी कमी होऊन ९८.५८ वर स्थिरावला आहे.
रुपयाचे अवमूल्यन अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने मध्यवर्ती बँकेने हस्तक्षेपाचे पाऊल उचलले. रिझर्व्ह बँकेकडून चलन बाजारात डॉलरची विक्री होणे अपेक्षितच होते. आता या पातळीपासून रुपया अधिक सावरण्याची आशा आहे, असे मुंबईतील सीएसबी बँकेचे ट्रेझरी विभागाचे प्रमुख आलोक सिंग यांनी नमूद केले.