मुंबई : विनिमय दरातील अस्थिरता आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातील घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सरलेल्या ऑगस्टमध्ये ७.७ अब्ज डॉलरची विक्री केल्याचे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालातून मंगळवारी समोर आले आहे.
अमेरिकी डॉलर विक्री/खरेदीच्या रिझर्व्ह बँकेच्या उपलब्ध करून आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये मध्यवर्ती बँकेची अमेरिकी डॉलरची निव्वळ विक्री ७.६९ अब्ज डॉलर नोंदवण्यात आली, जी त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत जवळजवळ तिप्पट होती. जुलै आणि ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँकेने अमेरिकी डॉलर खरेदी केले नसल्याचेही आकडेवारीवरून दिसून आले आहे.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर घसरलेल्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर महिन्यातदेखील चलन बाजारात हस्तक्षेप केल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. खासगी, सरकारी आणि परदेशी बँकांमधील सात व्यापाऱ्यांच्या मते, सप्टेंबर महिन्यातदेखील रिझर्व्ह बँकेने अंदाजे ५ अब्ज डॉलर खर्ची घातले आहेत.
नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड बाजारात लक्षणीय उलाढाल सुरू असल्याचे दिसून आले. रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य हस्तक्षेपांमुळे गेल्या आठवड्यात रुपया विक्रमी नीचांकातून डोके वर काढून, चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मध्यवर्ती बँकेने हस्तक्षेप करण्यापूर्वी, रुपयाने ८८.८१ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर मंगळवारी लोळण घेतली होती.
रुपया-डॉलर विनिमय दरासाठी कोणत्याही पातळीला लक्ष्य करत नसल्याची रिझर्व्ह बँकेने भूमिका घेतली आहे. मात्र चलन बाजारात अस्थिरता वाढते, तेव्हाच मध्यवर्ती बँक परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करते. ऑगस्टमध्ये, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १.६ टक्क्यांनी घसरला होता.
वाढता व्यापार तणाव, जागतिक अनिश्चितता आणि परकीय संस्थात्मक गुंतवणुकीच्या प्रवाहादरम्यान सप्टेंबरमध्ये देखील भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरला. देशाचा परकीय चलनसाठा १० ऑक्टोबर रोजी सरलेल्या आठवड्यात २.१७ अब्ज डॉलरने घसरून ६९७.७८ अब्ज डॉलर म्हणजेच ७०० अब्ज डॉलर खाली आला आहे.