पीटीआय, नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने खासगी क्षेत्रातील येस बँकेतील सुमारे १३.१८ टक्के हिस्सेदारीची विक्री केल्याची बुधवारी घोषणा केली. जपानच्या सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला सुमारे ८,८८८.९७ कोटी रुपयांना समभागांची विक्री स्टेट बँकेने केली.
सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपशी (एसएमएफजी) संबंधित जपानी बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी, सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनकडून (एसएमबीसी) समभाग विक्रीच्या मोबदल्यात ८,८८८.९७ कोटी रुपये मिळाले आहेत, असे बँकेने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
एसएमएफजीचा घटक असलेली सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन ही भारतातील आघाडीच्या परदेशी बँकांपैकी एक आहे. तर जपानमधील दुसरा सर्वात मोठा बँकिंग गट आहे, ज्याची एकूण मालमत्ता सुमारे २ ट्रिलियन अमेरिकी डॉलर आहे.
केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये अधिसूचित केलेल्या बँक पुनर्रचना योजनेंतर्गत, स्टेट बँक ही येस बँकेची सर्वात मोठी भागधारक बनली. त्यानंतर, जुलै २०२० मध्ये येस बँकेने प्रस्तावित केलेल्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरचा भाग म्हणून स्टेट बँकेने अतिरिक्त समभागांची खरेदी केली.
जपानच्या सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला हिस्सा विक्री केल्यानंतर स्टेट बँकेची अजूनही येस बँकेतील १०.८ टक्के हिस्सेदारी कायम आहे. स्टेट बँक आणि इतर भागधारक बँकांनी जपानच्या सुमितोमो मित्सुईला येस बँकेतील केलेली आंशिक हिस्सा विक्री ही भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी सीमापार गुंतवणूक आहे. या व्यवहाराला रिझर्व्ह बँक आणि भारतीय स्पर्धा आयोगासह आवश्यक नियामक आणि वैधानिक मान्यता मिळाल्या आहेत.
वर्ष २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेने आखलेली येस बँकेची पुनर्रचना योजना ही एक नाविन्यपूर्ण, सार्वजनिक – खासगी धाटणीची पहिली भागीदारी होती, जी भारत सरकारने पूर्णपणे समर्थनासह, सुलभ केली होती. २०२० मध्ये स्टेट बँक एक प्रमुख भागधारक आणि तिचे प्रतिनिधी संचालक मंडळात सामील झाल्यापासून येस बँकेच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल झाले, असे स्टेट बँकेचे अध्यक्ष सीएस शेट्टी म्हणाले.
सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बँक आणि इतर सहयोगी बँकांच्या प्रयत्नांद्वारे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याचे हे कदाचित सर्वोत्तम उदाहरण आहे, असे त्यांनी नमूद केले.
मंगळवारच्या सत्रात येस बँकेचा समभाग २१.१५ रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या बाजार भावानुसार बँकेचे ६६,३४९ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.