मुंबई : भारत- पाकिस्तानमधील वाढता भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत आघाडीवर बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हमधील समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे निर्देशांक घसरले. मात्र परदेशी निधीच्या आगमनामुळे बुधवारी बाजारातील घसरण मर्यादित राहिली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४६.१४ अंशांनी घसरून ८०,२४२.२४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८०,५२५.६१ ही उच्चांकी तर ७९,८७९.१५ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर मात्र ८०,००० अंश पातळीच्या पुढे बंद होण्यास यशस्वी ठरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये नगण्य घसरण झाली आणि तो २४,३३४.२० पातळीवर बंद झाला.

व्यापार शुल्कासंबंधित तणाव कमी होऊन अमेरिका-भारत व्यापार करार यशस्वी होण्याची आशा आहे. शिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नव्याने केलेल्या गुंतवणुकीमुळे बाजाराने चांगली कामगिरी केली. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि चौथ्या तिमाहीतील असमाधानकारक कामगिरीमुळे निर्देशांकांची गती मर्यादित राहिली. बाजारात येत्या काही सत्रात नकारात्मक वातावरण कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स प्रत्येकी ५ टक्क्यांपर्यंत घसरले. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा स्टील आणि एशियन पेंट्स यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. तर मारुती, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचडीएफसी बँकेचा समभाग वधारून बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) २,३८५.६१ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले. ‘महाराष्ट्र दिना’निमित्त गुरुवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानी शेअर बाजारात घसरण

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत वाढलेल्या तणावामुळे पाकिस्तान शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. भारताकडून पाकिस्तानवर लष्करी हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे, अनिश्चिततेमुळे पाकिस्तान शेअर बाजाराचा निर्देशांक केएसई १०० मध्ये ३ टक्क्यांहून अधिक म्हणजेच ३,००० अंशांची घसरण झाली. तो १,११,३५२ अंशांवर बंद झाला. भारत पुढील २४-३६ तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहे, असा दावा तेथील माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी केल्याने अनिश्चिततेत भर घातली.

सेन्सेक्स ८०,२४२.२४ – ४६.१४ (-०.०६%)

निफ्टी २४,३३४.२० -१.७५ (-०.०१%)

तेल ६३.६६ -०.९२%

डॉलर ८४.५८ -३८ पैसे