लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ३ टक्के, तर एचडीएफसी बँकेत २ टक्क्यांहून मोठी वाढ शक्य करणारी झालेली खरेदी, तसेच परदेशी गुंतवणुकीच्या वाढलेल्या ओघामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांची सलग चौथ्या दिवशीही आगेकूच सोमवारी सुरू राहिली. बाजारातील दिवाळीच्या वातावरणातील आशावाद हा जागतिक बाजारात दिसून आलेल्या तीव्र तेजीने आणखी दुणावला.
भारतीय शेअर बाजाराने संवत्सर २०८१ च्या अखेरच्या सत्राची सांगता सकारात्मक पद्धतीने केला. हिंदू पंचांगानुसार २०८२ या नव्या संवत्सराची सुरुवात मंगळवारपासून सुरू होईल. दिवाळी ते दिवाळी अशा वर्षभराच्या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी प्रत्येकी ६ टक्क्यांची कमाई केली आहे.
सत्रअखेरीस सेन्सेक्सने ८४ हजारांची पातळीला पुन्हा गाठले. ४११.१८ अंशांच्या (०.४९ टक्के) कमाईसह तो ८४,३६३.३७ वर स्थिरावला. दिवसभरात ७०४.३७ अंशांची झेप घेत सेन्सेक्सने ८४,६५६.५६ चा उच्चांक गाठला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक १३३.३० अंशांनी (०.५२ टक्के) वाढून २५,८४३.१५ वर पोहोचला.
शुक्रवारी सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात ९.६ टक्के वाढ नोंदवल्यानंतर बाजार अग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग ३ टक्क्यांनी वधारून, १,४५९.९० रुपयांवर पोहोचला. किराणा आणि दूरसंचार व्यवसायातील चांगली कामगिरी आणि तेल ते रसायने या क्षेत्रातील व्यवसायामध्ये सुधारणा यामुळे या रिलायन्सचा तिमाही नफा वाढला. सप्टेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १० टक्क्यांनी वाढ नोंदवल्यानंतर सोमवारी एचडीएफसी बँकेचा समभागही दोन्हीवर शेअर बाजारांवर १.७४ टक्क्यांनी वाढून १,०२० रुपये असा ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला.
बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, स्टेट बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन आणि भारती एअरटेल हे सेन्सेक्समधील अन्य कंपन्यांचे समभागही वाढले. त्या उलट आयसीआयसीआय बँक, महिंद्र अँड महिंद्र, इटर्नल, अदानी पोर्ट्स आणि पॉवर ग्रिड हे समभाग घसरणीच्या यादीत होते. मुंबई शेअर बाजारावर एकूण २,५३० समभाग वधारले, तर १,७४० समभाग घसरणीत राहिले.
जगभरात तेजीचा बहर
पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारांमध्ये, दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक, शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँग सेंग असे सर्व प्रमुख निर्देशांक वधारले. सोमवारी युरोपातील बाजारपेठांमध्ये सकारात्मक व्यवहार सुरू होते. शुक्रवारी अमेरिकी बाजारही वाढीसह बंद झाले होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) पुन्हा खरेदी सुरू केली असून, सरलेल्या शुक्रवारी त्यांनी ३०८.९८ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली.
मुहूर्ताचे विशेष सत्र दुपारी
दिवाळीतील पारंपरिक मुहूर्ताच्या व्यवहारांपूर्वी, उत्सवी तेजीला पुढे नेत सेन्सेक्स-निफ्टीने सोमवारी आगेकूच कायम ठेवली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँकेसारख्या दिग्गज समभागांत झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारालाही स्फुरण चढले. मंगळवारी बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारातील नियमित व्यवहार बंद असतील. मात्र लक्ष्मीपूजनानिमित्त दुपारी १.४५ ते २.४५ या दरम्यान तासाभरासाठी विशेष मुहूर्त व्यवहारांचे सत्र योजण्यात आले आहे.