मुंबई : सलग तीन सत्रातील घसरणीनंतर मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ४४७ अंशांची उसळी घेतली. निर्देशांकातील आघाडीची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांसह इतर ब्लू-चिप कंपन्यांमधील तेजीने प्रमुख निर्देशांकांना बळ मिळाले.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा समभाग ४४६.९३ अंशांनी वधारून ८१,३३७.९५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५३८.८६ अंशांची कमाई करत ८१,४२९.८८ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४०.२० अंशांची वाढ झाली आणि तो २४,८२१.१० पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, रिलायन्स इंडस्ट्रीज २.२१ टक्क्यांनी वधारला. लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, मारुती, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक यांची कामगिरी समाधानकारक राहिली. तर, अॅक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन आणि आयटीसी यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ६,०८२.४७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
परदेशी बाजारपेठ
आशियाई बाजारपेठांमध्ये, जपानचा निक्केई निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँग सेंगमध्ये घसरण झाली तर दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. युरोपमधील बाजारपेठांमध्ये तेजी दिसून आली. सोमवारी अमेरिकी बाजारपेठांमध्ये संमिश्र वातावरण राहिले.
तेजीची कारणे काय?
- १) मूल्य खरेदी: अलिकडच्या घसरणीनंतर माहिती तंत्रज्ञान (आयटी), धातू आणि गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. सलग पाच सत्रांमध्ये घसरण झाल्यानंतर निफ्टी रिअल्टी निर्देशांक २ टक्क्यांनी वधारला. निफ्टी ऑटोमध्येही १ टक्के तेजी होती.
- २) अस्थिरतेत घसरण: बाजारातील अस्थिरतेचा मापक असलेला इंडिया व्हीआयएक्स २.९ टक्क्यांनी घसरून ११.७१ वर आला. कमी व्हीआयएक्स सामान्यतः गुंतवणूकदारांच्या भीतीत घट दर्शवितो आणि जोखीम घेण्याची क्षमता सुधारतो, ज्यामुळे इक्विटींना आधार मिळतो.
- ३) सकारात्मक जागतिक संकेत: आशियाई बाजार पेठांमध्ये शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी सकारात्मक क्षेत्रात बंद झाले. वॉल स्ट्रीट फ्युचर्स देखील तेजीत होता.