मुंबई : अमेरिकी शिष्टमंडळाशी सुरू असलेल्या सकारात्मक द्विपक्षीय व्यापार चर्चेमुळे, बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत राहिले. गुंतवणूकदारांचा आयटी, बँकिंग आणि वाहन निर्मिती समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१३.०२ अंशांनी वधारून ८२,६९३.७१ पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९१.१५ अंशांची भर पडली आणि तो २५,३३०.२५ पातळीवर बंद झाला.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची वाढती अपेक्षा आणि प्रस्तावित व्यापार करारावर अमेरिका-भारतादरम्यान सकारात्मक चर्चा यामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे, असे विश्लेषक म्हणाले. दोन्ही बाजूंनी करार लवकर तसेच परस्पर फायदेशीर होण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सांगितले.

देशांतर्गत भांडवली बाजाराने गती कायम राखली असून, भारत-अमेरिका व्यापार चर्चेचे पुनरुज्जीवन आणि अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपातीची निर्माण झालेल्या आशेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर आहे. मजबूत देशांतर्गत प्रवाह, चलन स्थिरता आणि अनुकूल भू-राजकीय स्थिती ही बाजारासाठी नजीकच्या काळात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करत आहेत, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्टेट बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोटक महिंद्र बँक, मारुती, ट्रेंट आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीसह स्थिरावले. तर बजाज फिनसर्व्ह, टायटन, आयटीसी आणि टाटा स्टीलच्या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.

रुपयाला २५ पैशांचे बळ

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारच्या सत्रात २५ पैशांनी वधारून ८७.८४ पातळीवर बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक कलाचा परिणाम चलन मूल्यावर दिसून आला. अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींसंबंधी आशावादाने चलन बाजाराला चालना दिली. बुधवारी सलग चौथ्या सत्रात भारतीय रुपया मजबूत झाला आणि अमेरिकी फेडकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षेतून अमेरिकी चलनाच्या कमकुवतपणा अडीच आठवड्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावर इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत डॉलर नरमल्यामुळे रुपया मजबूत होत आहे. जगभरातील भांडवली बाजारांकडून फेडकडून पाव टक्के व्याजदर कपात गृहित धरली जात आहे. परकीय चलन बाजारात, रुपयाने ८७.८४ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली, नंतर ८७.७१ प्रति डॉलर अशी सत्रातील नीचांकी आणि ८७.८६ ही उच्चांकी पातळी गाठली.

  • सेन्सेक्स ८२,६९३.७१ ३१३.०२
  • निफ्टी २५,३३०.२५ ९१.१५
  • तेल ६८.०७ -०.५८ टक्के
  • डॉलर ८७.८४ -२५ पैसे