मुंबई: महिन्याच्या अखेरीस अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची आशा आणि आशियाई-युरोपीय भांडवली बाजारांतील तेजीचे अनुकरण करीत बुधवारी स्थानिक बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ५७५ अंशांनी वधारला, तर निफ्टी २५,३०० पातळीवर बंद झाला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५७५.४५ अंशांनी वधारून, ८२,६०५.४३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६९७.०४ अंशांची कमाई करत ८२,७२७.०२ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १७८.०५ अंशांची कमाई करत २५,३२३.५५ या पातळीवर बंद झाला.

अमेरिका-चीन व्यापारातील काही प्रमाणात घट आणि अलीकडच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवरून रुपयाच्या मूल्यात झालेला वाढीमुळे देशांतर्गत बाजारात उत्साह निर्माण केला. याव्यतिरिक्त, कंपन्यांच्या तिमाही उत्पन्न हंगामाची स्थिर सुरुवात आणि पतमानांकन कंपन्यांच्या भारताबद्दलच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे बाजाराला बळ मिळाले आहे. यामुळे जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि तणावाबद्दलच्या चिंतेला तोंड देण्यास मदत झाली आहे, असे रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे विश्लेषक अजित मिश्रा म्हणाले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग सर्वाधिक वधारले. त्यापाठोपाठ एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट, इटर्नल आणि अदानी पोर्ट्स यांचे समभाग तेजीसह स्थिरावले. तर टाटा मोटर्स, इन्फोसिस, टेक महिंद्र आणि ॲक्सिस बँकेचे समभाग घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्स ८२,६०५.४३ ५७५.४५ ( ०.७०%)

निफ्टी २५,३२३.५५ १७८.०५ ( ०.७१%)

तेल ६२.२८ -०.१८%

डॉलर ८८.०६ – ७५ पैसे