मुंबई : जागतिक भांडवली बाजारातील तेजी आणि देशांतर्गत आघाडीवर धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर स्थिरावले.

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २२३.८६ अंशांनी वधारून ८१,२०७.१७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ८१,२५१.९९ अंशांचा उच्चांक आणि ८०,६४९.५७ अंशांची नीचांकी पातळी गाठली. सत्रातील नीचांकी पातळीपासून त्याने ६०२.४२ अंशांची मुसंडी मारली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ५७.९५ अंशांची वाढ झाली आणि तो २४,८९४.२५ पातळीवर बंद झाला.

धातू आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे बाजार प्रमुख निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. ऑक्टोबरमध्ये अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडच्या संभाव्य दर कपातीबद्दल आशावाद, डॉलर कमकुवत आणि धातूंच्या वाढत्या किमती यामुळे धातू निर्देशांकांमध्ये तेजी आली. याबरोबरच चांगला मान्सून आणि महागाईत घट यामुळे उपभोग ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांचे समभाग तेजीत आहेत. वस्तू आणि सेवाकर कमी झाल्यामुळे लोकांची खरेदी शक्ती वाढल्याने एकूण मागणी वाढली आहे. गुंतवणूकदारांनी स्टॉक-केंद्रित समभाग खरेदी केल्याने व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केली. आगामी तिमाहीत कंपन्यांकडून चांगली आर्थिक कामगिरी अपेक्षित आहे. शिवाय रिझर्व्ह बँकेकडून संभाव्य दरकपात आणि सणोत्सवाच्या हंगामामुळे बाजारात चैतन्याचे वातावरण आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

धातू कंपन्यांच्या समभागांना चमक

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, टाटा स्टीलचा समभाग ३.४० टक्क्यांनी वधारला, त्यापाठोपाठ पॉवर ग्रिड, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, लार्सन अँड टुब्रो, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारती एअरटेल हे समभाग तेजीत होते. याउलट, टेक महिंद्र, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फिनसर्व्ह यांनी मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. बीएसई मेटल निर्देशांक १.८५ टक्क्यांनी वधारला. यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी ६.१८ टक्के, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी ३.१० टक्के आणि जिंदाल स्टेनलेस २.८७ टक्क्यांनी वधारला होता.