मुंबई: अत्यंत वादळी चढ-उतार राहिलेल्या सप्ताहसांगतेच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी सत्रारंभी केलेली मोठी कमाई नंतरच्या व्यवहारांत पूर्णपणे गमावून सपाटीला दिवसाला निरोप दिला. जागतिक व्यापार युद्धाचे सावट आणि अर्थ-अनिश्चिततेने गुंतवणूकदार सावध बनल्याचे आढळून आले.

सलग दोन सत्रांतील मुसंडीनंतर शुक्रवारी सेन्सेक्सने थोडी विश्रांती घेतल्याचे दिसून आले. दिवसअखेरीस तो ७.५१ अंशांच्या नगण्य घसरणीसह ७४,३३२.५८ वर बंद झाला. सत्राच्या मध्याला तो २४६ अंशांच्या वाढीसह ७४,५८६.४३ या उच्चांकापर्यंत झेपावला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकाने सलग तिसऱ्या सत्रात सकारात्मक बंद नोंदविला. ७.८० अंशांच्या नाममात्र वाढीसह तो २२,५५२.५० या पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला. सत्रांतर्गत त्यानेही ८९ अंशांच्या कमाईसह २२,६३३.८० च्या उच्चांकाला गवसणी घातली होती. गत दोन दिवसांत सेन्सेक्सने तब्बल १,३५० अंशांची कमाई केली आहे, तर निफ्टीने तीन दिवसांत ४६०.८५ अंशांची भर घातली आहे.

अमेरिकेने लादलेले व्यापार कर आणि चीन-कॅनडाने सुरू केलेली प्रत्युत्तरच्या भाषेने जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. एकंदर अस्पष्टतेमुळे जोखीम टाळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत समभाग गुंतवणुकीचे आकर्षण स्वाभाविकच कमी झाले आहे. परिणामी उभरत्या बाजारांना बड्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची लक्षणीय माघार अनुभवावी लागत आहे. खुद्द अमेरिकी भांडवली बाजारात, एस अँड पी ५०० निर्देशांकात पडझड आणि खोलवर सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थेला आयात करात वाढीच्या संभाव्य परिणामांची झळ बसणार असून, त्याबद्दल तेथील बाजार चिंता दर्शवत आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सेक्समधून, शुक्रवारीही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने ३.३२ टक्क्यांची चांगली वाढ साधली. त्यामुळे निर्देशांकातील एकंदर घसरणही मर्यादित राहिली. पाठोपाठ, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक महिंद्र बँक हे वाढ साधणारे समभाग ठरले.