मुंबई : जागतिक पातळीवर अमेरिका आणि जपानदरम्यान सुरू असलेल्या व्यापार शुल्कासंबंधित वाटाघाटींमध्ये यश मिळण्याची अपेक्षा आणि देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदार पुन्हा परतल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारच्या सत्रात २ टक्क्यांची वाढ नोंदवली.
गुंतवणूकदारांना अमेरिका आणि जपानमध्ये व्यापार शुल्कांवरील सुरू असलेल्या वाटाघाटींमधून सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे. दोन्ही देश सध्या व्यापार शुल्कांबाबत चर्चेत गुंतले आहेत, शक्य तितक्या लवकर सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,५०८.९१ अंशांनी म्हणजेच १.९६ टक्क्यांनी वधारून ७८,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा ओलांडली. सेन्सेक्स अखेर ७८,५५३.२० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,५७२.४८ अंशांची कमाई करत ७८,६१६.७७ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ४१४.४५ अंशांची भर घालत (१.७७ टक्के) २३,८५१.६५ अंशांची पातळी गाठली. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्स ४,७०६.०५ अंशांनी म्हणजेच ६.३७ टक्क्यांनी वधारला आणि निफ्टी १,४५२.५ अंशांनी वधारला आहे.
बचत ठेवींच्या व्याजदरांमध्ये कपात केल्यामुळे बँकांच्या ताळेबंदावर त्याचे सकारात्मक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. परिणामी, बँकांसह निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार तेजी दिसून आली. जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण असूनही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय भांडवली बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. आता अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींमधून अनुकूल निकालाची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, महागाईचा दर आणखी कमी होण्याच्या आशावादाने बाजारात उत्साहाचे वातावरण होते, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
तेजीची कारणे काय?
सकारात्मक आशियाई भांडवली बाजार
अमेरिका आणि जपानमधील व्यापार वाटाघाटी यशस्वी होण्याच्या शक्यतेने आशियातील बहुतांश देशांच्या भांडवली बाजारात उत्साह संचारला होता.
मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी
निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकांमधील तेजीने सेन्सेक्समध्ये सुमारे ४५० अंशांची भर घातली. तर रिलायन्स इंडस्ट्रीजने १५० अंशांची आणि भारती एअरटेलने तेजीत १२५ अंशांचे योगदान दिले.
भारतीय रुपयाचे मूल्यवृद्धी
सलग चौथ्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला आहे. मजबूत देशांतर्गत आर्थिक कामगिरी आणि शेअर बाजारातील तेजीने रुपयाला बळ दिले आहे, शिवाय अमेरिकेने अतिरिक्त शुल्क वाढ पुढे ढकलल्यामुळे डॉलर कमकुवत झाला आहे. सध्याच्या अनिश्चित धोरणाचा अमेरिकेच्या आर्थिक वाढ आणि स्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तेलाचे नरमलेले दर
खनिज तेलाच्या किमती प्रतिपिंप ७० डॉलर्सच्या खालीच राहिल्या आहेत. इराणी तेल व्यापार रोखण्यासाठी अमेरिकेने आणखी लादलेले निर्बंध आणि ओपेक गटातील काही राष्ट्रांकडून खनिज तेलाचे उत्पादन वाढवले आहे.
महागाईत घसरण
देशात मार्चमध्ये किरकोळ महागाई दर ३.३४ टक्क्यांपर्यंत कमी झाली, जी सप्टेंबर २०१९ नंतरची नीचांकी पातळी आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईतून दिलासा मिळाला आहे.
सामान्य मान्सूनचा अंदाज
वर्ष २०२५ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चांगल्या पावसामुळे अन्नधान्याच्या किमती आणखी कमी होण्यास मदत होईल.
१,५०८.९१ अंशांनी म्हणजेच १.९६ टक्क्यांनी वधारून ७८,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा ओलांडली. सेन्सेक्स अखेर ७८,५५३.२० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,५७२.४८ अंशांची कमाई करत ७८,६१६.७७ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ४१४.४५ अंशांची भर घालत (१.७७ टक्के) २३,८५१.६५ अंशांची पातळी गाठली. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्स ४,७०६.०५ अंशांनी म्हणजेच ६.३७ टक्क्यांनी वधारला आणि निफ्टी १,४५२.५ अंशांनी वधारला आहे.
सेन्सेक्स ७८,५५३.२० १,५०८.९१ ( १.९६%)
निफ्टी २३,८५१.६५ ४१४.४५ ( १.७७%)
तेल ६६.४७ ०.९४ %
डॉलर ८५.३७ – २७ पैसे