करोनानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात करण्यात येत आहे. जागतिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं संकट निर्माण झालं आहे. आता टेस्लामध्येही कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचं पुढे आलं आहे. इलेक्ट्रेकने यासंदर्भातील वृत्त दिलं असून एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीचे मेल केले आहेत, असं वृत्तामध्ये म्हटलं आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीतील मंदीमुळे टेस्ला जागतिक स्तरावर १० टक्के पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग कमी करेल, असं एलॉन मस्क यांनी ईमेलमध्ये म्हटलं आहे. ठराविक भागात कामाच्या समान स्वरुपामुळे ही कपात होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये एलोन मस्क यांनी म्हटलंय की, “आम्ही कंपनीला आमच्या वाढीच्या पुढील टप्प्यासाठी तयार करत असताना, खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कंपनीच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आम्ही संस्थेचे सखोल पुनरावलोकन केले आहे आणि जागतिक स्तरावर आमची संख्या १० टक्केपेक्षा कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय कठोर असला तरीही मला घ्यावा लागणार आहे.

किती कर्मचारी प्रभावित होऊ शकतात?

टेस्लामध्ये गेल्यावर्षीच्या आकडेवारीनुसार १ लाख ४० हजार ४७३ कर्मचारी आहेत. गेल्या तीन वर्षांत टेस्लामध्ये कर्मचारी दुप्पटीने वाढले आहेत. ऑस्टिन आणि बर्लिनच्या बाहेर दोन प्लांटमध्ये उत्पादन वाढवण्याा निर्णय कंपनीने घेतला आहे. जर नोकरीतील कपात कंपनीभर लागू झाली, तर बडतर्फीचा परिणाम किमान १४ हजार कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो.

हेही वाचा >> टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर

टेस्लाने २०२२ च्या मध्यात सुमारे १० टक्के कामगारांना काढून टाकले होते. यासंदर्भात ब्लूमबर्गने अहवाल दिला होता. आता पुन्हा १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडणार असल्याने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

टेस्लाची उत्पादने भारतात येणार?

टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, एलॉन मस्क यांना भारतात टेस्लासाठी मोठी गुंतवणूक करायची आहे. केंद्र सरकारच्या अटी आणि शर्तीमुळे टेस्लाची इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात आतापर्यंत उतरु शकली नाहीत. आता टेस्लाची इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात आणण्यासाठी टेस्लाचे प्रयत्न सुरू आहेत.