मुंबई : भारताचा परकीय चलन साठा ६४५.६ अब्ज डॉलर अशा सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला असल्याचे नमूद करून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी,परकीय चलन तैनातीचा एक भाग म्हणून भारत सोन्याचा साठा देखील वाढवत असल्याचे सांगितले.

पतधोरण आढाव्याच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दास यांनी स्पष्ट केले की, २९ मार्च २०२४ पर्यंत एकूण परकीय चलन साठा ६४५.६ अब्ज डॉलर अशा सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे, ज्याचा तपशील साप्ताहिक सांख्यिकीय परिशिष्टासह उपलब्ध केला जाईल. गेल्या चार-पाच वर्षांत परकीय चलन साठा वाढवण्यावर मध्यवर्ती बँकेने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले. जेणेकरून भविष्यात भारतातून डॉलरचे निर्गमन होईल तेव्हा उद्भवणाऱ्या कोणत्याही जोखमींविरुद्ध ते सुरक्षा कवच म्हणून काम करेल. रुपयाचे मूल्य स्थिर राखणे ही रिझर्व्ह बँकेची प्राथमिकता असल्याचेही दास म्हणाले.

हेही वाचा >>>सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

‘राखीव तैनातीचा एक भाग म्हणून आम्ही सुवर्ण साठा विस्तारत आहोत,’ असे दास यांनी सांगितले. सोन्याच्या खरेदीच्या प्रमाणाबाबत मात्र गव्हर्नरांनी तपशिलवार काहीही सांगितले नाही. तथापि सोन्याच्या साठ्याच्या मूल्यात वाढ दर्शविणाऱ्या अधिकृत आकडेवारीकडे लक्ष वेधले. अधिकृत आकडेवारीनुसार, मार्च २०२२ अखेर परकीय चलन साठ्यात सोन्याचे मूल्य ६.२८७ अब्ज डॉलर होते, ज्याचे मूल्य मार्च २०२३ अखेर ५१.४८७ अब्ज डॉलरपेक्षा जास्त म्हणजे ८ पटींहून अधिक वाढले आहे.

रिझर्व्ह बँकेने जानेवारीमध्ये ८.७ टन सोने आंतरराष्ट्रीय स्तरावरून खरेदी केले जे दोन वर्षांतील सर्वोच्च प्रमाण आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीअखेरीस मध्यवर्ती बँकेकडील सोने ८१२.३ टनांवर पोहोचले आहे, जे मागील महिन्यात ८०३.५८ टन होते. जगभरातील सर्वच मध्यवर्ती बँकांकडून लक्षणीय प्रमाणात होत असलेल्या सोने खरेदीने गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरातही तेजी दिसून आली आहे.