सुधीर जोशी
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीच्या प्रतीक्षेत भांडवली बाजारात सरलेल्या सप्ताहाच्या सुरुवातीला मरगळ होती. जागतिक संकेतही फारसे उत्साही नव्हते. गेल्या दोन सप्ताहांत तेजीत राहिलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नफा वसुली सुरू झाली होती पण, सप्ताहाच्या शेवटी ती आणखी गहिरी झाली. एचसीएल टेकने दिलेले नकारात्मक संकेत आणि क्रेडिट सुईसने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरील जाहीर केलेल्या नकारात्मक अहवालाने बाजारात या क्षेत्रात ६ टक्क्यांची घसरण झाली. पण बँकिंग क्षेत्रातील सरकारी बँकांच्या समभागात आलेल्या तेजाने बाजार सावरला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीनंतर जाहीर झालेली रेपो रेटमधील ३५ आधारबिंदूंची वाढ बाजाराला अपेक्षित होती. पण पुढील काळात या दरवाढीला पूर्णविराम मिळेल का? याबाबत काही ठोस वक्तव्य केले गेले नाही तसेच चलनवाढीबाबतही रिझर्व्ह बँकेचा पवित्रा सावध होता. त्यामुळे बाजारातही गेल्या सप्ताहाचा उत्साह टिकला नाही. आधीच्या दोन सप्ताहांच्या तेजीला सरलेल्या सप्ताहात खीळ बसली.

निओजेन केमिकल्स :

ही ३० वर्षे जुनी कंपनी एका आयआयटी इंजिनीअरने स्थापन केलेली कंपनी, ब्रोमाईन व लिथियमवर आधारित विशेष रसायने (स्पेशालिटी केमिकल) बनविण्यात आद्य मानली जाते. या स्मॉलकॅप कंपनीने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रीत ३१ टक्के वाढ साध्य केली. मात्र नफ्यात १२ टक्के घसरण झाली. कंपनीच्या दहेज येथील कार्यविस्तार पूर्ण झाल्यावर कंपनीच्या विक्रीत आणखी ५० कोटींची भर पडेल. कंपनीच्या उत्पादनांना औषध, शेतकी रसायने, पाण्यावरील प्रक्रिया तसेच लिथियम आयन बॅटरी उद्योगांकडून मागणी असते. कंपनीचे ६५ टक्के भांडवल प्रवर्तकांकडे आहे व उरलेल्या ३५ टक्यांत निम्मा वाटा म्युच्युअल फंड आणि परदेशी गुंतवणूकदारांचा आहे. कंपनीच्या समभागाचा गेल्या ३ वर्षांतील बाजारातील आलेख कायम उंचावणारा आहे. सध्याच्या घसरलेल्या भावात हे समभाग घेण्याची संधी आहे.

आयटीसी :

सिगारेट, हॉटेल्स, ग्राहक उपभोग्य वस्तू आणि खाद्यपदार्थ, कागद, लिखाण साहित्य व पॅकेजिंग आणि माहिती तंत्रज्ञान अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रात वावर व अनेक लोकप्रिय नाममुद्रांची मालकी असून या कंपनीचे समभाग २०२२ या कॅलेंडर वर्षात सर्वात चांगली कामगिरी करणारे ठरले. या वर्षात जवळजवळ ५० टक्क्यांची वाढ या समभागात झाली. करोनाकाळानंतर हॉटेल व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस आले. शाळा महाविद्यालय पूर्वीसारखे सुरू झाले आहेत, ई-कॉमर्समुळे पॅकेजिंगची मागणी वाढली, त्या परिणामी कागदांच्या किमती व मागणीत मोठी वाढ झाली आहे. कंपनीच्या सर्वच व्यवसायांत सध्या वाढ होत आहे. पाम तेल आणि अन्नधान्याच्या किमती आटोक्यात आल्या आहेत. सप्टेंबर अखेरच्या सहा महिन्यांत कंपनीने उत्पन्नात ३३ टक्के तर नफ्यात २७ टक्के वाढ साधली आहे. ही भरभराट आणखी काही वर्षे सुरू राहण्याचा अंदाज आहे. कंपनीचे इतर व्यवसाय वेगळे करून समभागांचे मूल्यवर्धन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान भागधारकांनी समभाग राखून ठेवावेत. गेल्या काही दिवसांत समभागांची ३३५ ते ३४० रुपयांपर्यंत झालेली घसरण खरेदीची संधी आहे.

इंडसइंड बँक :

भारतातील बँकिंग क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारी बँक म्हणून उदयास आली आहे. इतर खासगी बँकांप्रमाणे सेवांमध्ये पर्सनल बँकिंग, ठेवी, कर्ज, गुंतवणूक, विमा, विदेशी मुद्रा सेवा यांसारखी उत्पादने आणि डीमॅट, ऑनलाइन शेअर ट्रेडिंग, नेट बँकिंग, संपत्ती व्यवस्थापन, एनआरआय बँकिंग – मनी ट्रान्सफर सेवांची विस्तृत श्रेणी या बँकेकडे आहे. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीमधे बँकेचा नफा आधीच्या वर्षाच्या तुलनेत ५७ टक्क्यांनी वाढून १८०० कोटींवर पोहोचला आहे. सर्वच बँकांकडील कर्जाची मागणी सध्या १५ टक्क्यांनी वाढली आहे. खासगी बँकांचा कर्ज वाटपात मोठा वाटा आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात बँकिंग क्षेत्र चांगली कमाई करून देईल. इतर खासगी बँकांच्या तुलनेत या बँकेचे समभाग वाजवी भावात मिळत आहेत.

सुप्राजित इंजिनीअरिंग :

ही कंपनी वाहनांसाठी लागणाऱ्या विविध केबल्सची सर्वात मोठी पुरवठादार आहे. वाहनांमधे ब्रेक, क्लच, थ्रॉटल, गियर, चोक, स्पीडोमीटर, टॅकोमीटर, खिडक्यांच्या काचा, आरसे, आसन व्यवस्था अशा अनेक गोष्टी केबलद्वारे नियंत्रित केल्या जातात. दुचाकीसाठी लागणाऱ्या केबलचा ७० टक्के पुरवठा तर चारचाकी वाहनांच्या केबलचा ३५ टक्के पुरवठा या कंपनीमार्फत केला जातो. बिगरवाहन क्षेत्रात कपडे धुण्याची यंत्रे, अवजड माल हाताळणी करणारी यंत्रे, सागरी वाहतूक व्यवसाय अशा क्षेत्रांनादेखील ही कंपनी केबलचा पुरवठा करते. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ४५ टक्क्यांनी वाढून ७२० कोटी रुपये झाले आहे. मात्र नफ्यात १५ टक्क्यांची घट झाली आहे. वाहन क्षेत्रातील मागणीत अपेक्षित सुधारणा आणि भारत-६ वायू उत्सर्जन मानदंडांच्या निकषांसाठी वाहनातील केबलचे वाढलेले प्रमाण ध्यानात घेतले तर कंपनीच्या उत्पादनांना भविष्यात आणखी मागणी वाढेल. सध्याच्या ३४० ते ३५० रुपयांच्या पातळीवर या कंपनीत दोन वर्षांच्या गुंतवणुकीवर चांगला नफा मिळण्याची संधी वाटते.बाजाराला मोठी हालचाल करायला काही फारशी मोठी कारणे सध्या नाहीत. या सप्ताहात जाहीर होणारे अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आणि युरोपियन सेंट्रल बँकेच्या पतधोरणाकडे जगातील सर्वच बाजारांचे लक्ष असेल. भारतात किरकोळ दरांवर आधारित महागाईचे नोव्हेंबर महिन्याचे आकडे जाहीर होतील. त्यावरून रिझर्व्ह बँकेच्या धोरणाचे फलित आणि भविष्यातील शक्यता बाजार अजमावेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com