लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : अमेरिकी सरकारने लाचखोरीच्या संशयावरून चौकशीची व्याप्ती वाढवल्याचे वृत्ताने, भांडवली बाजारात सोमवारी अदानी समूहाच्या सर्व १० कंपन्यांच्या समभागांना विक्रीचा फटका बसून गळती लागली. समूहातील आघाडीची कंपनी अदानी एंटरप्रायझेससह, तर अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर आणि अन्य समभागांमध्ये जवळपास ४ टक्क्यांपर्यंत घसरणीने, समूहाच्या एकत्रित बाजार भांडवलात सुमारे ९० हजार कोटींनी कात्री लागली. अदानी समूहातील कंपनी किंवा सहयोगी कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य देण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली काय आणि या प्रकरणात अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांच्या भूमिकेचा शोध घेणारा तपास अमेरिकी सरकारकडून केला जात आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने शुक्रवारी दिले. न्यूयॉर्कचे ॲटर्नी कार्यालय आणि न्याय विभागाची फसवणुकीसंदर्भातील कक्षाकडून या प्रकरणी तपास हाताळत जात आहे. अदानी समूहाच्या प्रवक्त्याने मात्र कंपनी किंवा तिच्या संस्थापकाविरूद्ध कोणत्याही चौकशीची माहिती नाही.

दरम्यान, राजस्थान सरकारच्या मालकीची वीज वितरण कंपनी जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेडकडून विलंब देयक अधिभार म्हणून १,३०० कोटी रुपयांची मागणी करणारी अदानी पॉवर राजस्थान लिमिटेडची याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अदानींच्या समभागातील घसरणीला हातभार लावला. मुंबई शेअर बाजारात अदानी टोटल गॅसचा समभाग ४.३५ टक्के, अदानी एनर्जी सोल्युशन्स ३.४० टक्के, अंबुजा सिमेंट्स २.८१ टक्के आणि एसीसी २.४३ टक्क्यांनी घसरला. एनडीटीव्हीचा समभाग देखील २.०८ टक्क्यांनी घसरला, अदानी विल्मर २.०५ टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जी १.६७ टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स १.२४ टक्क्यांनी, अदानी एंटरप्रायझेस ०.७१ टक्क्यांनी आणि अदानी पॉवर ०.३५ टक्क्यांनी घसरला. अदानी पॉवर राजस्थान लिमिटेडची १,३०० कोटी रुपयांची मागणी करणारी याचिका फेटाळून लावताना, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि पीव्ही संजय कुमार यांच्या खंडपीठाने क्षुल्लक दावा दाखल केल्याबद्दल खर्चापोटी अदानींच्या कंपनीला ५०,००० रुपये भरण्यासही फर्मावले.