मुंबई : अमेरिकी बाजाराचे कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी निधी काढून घेत नफावसुलीला प्राधान्य दिल्याने शुक्रवारच्या सत्रात बाजारात मंदीवाल्यांचा पगडा राहिला. बँकिंग आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली.
हेही वाचा >>> भारत-अमेरिका दृढ मैत्री : जगाच्या दृष्टीनेही उपकारक
सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०६.६२ अंशांनी घसरून ६६,१६०.२० पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ३८८.१७ अंशांची घसरण अनुभवत ६५,८७८.६५ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १३.८५ अंशांची घसरण झाली आणि तो १९,६४६.०५ पातळीवर बंद झाला.
अमेरिकी अर्थव्यवस्थेचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) अपेक्षेपेक्षा चांगले असून देखील आणखी एका व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजाराचा मूडपालट झाला. जागतिक पातळीवरील अनिश्चितता, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीचा कल बदलणे आणि अमेरिकी रोख्यांच्या परतावा दरातील चढ-उतार यामुळे बाजारातील अस्थिरता अधिक वाढली आहे. मात्र बँक ऑफ जपानच्या व्याजदर दर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयामुळे आशियाई बाजार सकारात्मक राहिले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
हेही वाचा >>> टाटा मोटर्सची मोठी घोषणा, कंपनी DVR शेअर्सचे सामान्य शेअर्समध्ये रूपांतर करणार, तुम्हाला काय फायदा?
सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ॲक्सिस बँक, इन्फोसिस, इंडसइंड बँक, टेक महिंद्र आणि मारुती या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर एनटीपीसी, पॉवर ग्रिड, महिंद्र अँड महिंद्र, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे समभाग तेजीत होते.
शेअर बाजार आकडेवारी
सेन्सेक्स ६६,१६०.२० -१०६.६२ (०.१६ टक्के)
निफ्टी १९,६४६.०५ -१३.८५ (०.०७ टक्के)
डॉलर ८२.२४ ३२ तेल ८३.२९ -०.४२