ड्रोन निर्मिती क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) सोमवारपासून खुली झाली आणि पहिल्या तासाभरात विक्रीसाठी उपलब्ध समभागांना संपूर्ण मागणी येणारे अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवसअखेर ३.६९ पटीने अधिक भरणा पूर्ण केल्याचे उपलब्ध आकडेवारी दर्शवते. सामान्य तसेच संस्थात्मक दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळवत असलेल्या या भागविक्रीत गुंतवणूकदारांना गुरुवार २९ जूनपर्यंत सहभागी होता होईल. कंपनीने प्रति समभाग ६३८ ते ६७२ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून, कंपनी या माध्यमातून ५६७.२४ कोटी रुपयांचा निधी उभारू पाहत आहे.

मुंबईत मुख्यालय असलेल्या आयडियाफोर्जच्या या समभागांसाठी छोट्या वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या वर्गवारीत पहिल्या दिवशी साडेबारा पटीने अधिक मागणी आली, तर बिगर संस्थात्मक बड्या गुंतवणूकदारांच्या गटातून ५.१३ पट अधिक मागणी करणारे अर्ज दाखल झाले. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार गटातून जवळपास १०० टक्के अर्ज भरणा झाला आहे. या ‘आयपीओ’मधून नव्याने समभागांची विक्री करून २४० कोटी रुपये उभारले जाणार आहेत.

हेही वाचाः भरती प्रक्रियेत लाचखोरी झाल्याचे आरोप TCS नं फेटाळले; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

आयपीओतून उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी ५० कोटी रुपये कर्जफेडीसाठी वापरले जाणार आहेत. खेळत्या भांडवलासाठी १३५ कोटी रुपये आणि उत्पादन विकासासाठी ४० कोटी रुपयांचा वापर केला जाईल, असे आयडियाफोर्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित मेहता यांनी सांगितले. कंपनीवर सध्या ८५ कोटी रुपयांचा कर्जभार असून, आयपीओपश्चात तो बहुतांश कमी होणार आहे. भारताने २०३० पर्यंत ड्रोन निर्मिती व तंत्रज्ञानातील जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून, गेल्या वर्षी ‘ड्रोन नियम, २०२१’ला अंतिम रूप दिले गेल्याने अनेक वर्षांची नियामक अनिश्चितता संपुष्टात आली आहे.

हेही वाचाः २००० च्या नोटेनंतर आता ५०० रुपयांच्या नोटेबाबत मोठी माहिती; काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय सरकारची उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन (पीएलआय) योजना स्वदेशी ड्रोन उत्पादक आणि सेवा पुरवठादारांना मोठी चालना देणारी ठरली आहे. येत्या काही वर्षांत संरक्षण क्षेत्र, तसेच भू-सर्वेक्षण, शेती क्षेत्रात वापराव्यतिरिक्त ड्रोनचा अनेक नागरी क्षेत्रात वापर वाढेल, असा विश्वास मेहता यांनी व्यक्त केला. आयडियाफोर्जचा सुमारे ६९ टक्के महसूल सध्या संरक्षण क्षेत्र व सरकारी उपक्रमांकडून येत असल्याचे त्यांनी सांगितले. मेहता यांनी आयआयटी, मुंबईतील आपल्या तीन मित्रांसह ही कंपनी १६ वर्षांपूर्वी स्थापित केली आहे.