लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: भांडवली बाजार प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारी सलग चौथ्या दिवशी विक्रमी उच्चांक बिंदू गाठणारी आगेकूच कायम राखली आणि सेन्सेक्सने ६७ हजारांचा अनोखा टप्पाही ओलांडला. मंगळवारच्या व्यवहारातील तेजीला अमेरिकी आणि युरोपीय बाजारातील सकारात्मक कल गुंतवणूकदारांच्या खरेदी उत्साहाला हातभार लावणारा ठरला. विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राने नव्याने जागवलेल्या आशावादाने या समभागांची जोरदार खरेदी केली गेली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने प्रारंभापासून उच्चांकी आगेकूच कायम राखताना, २०५.२१ अंशांची (०.३१ टक्के) भर घालून ६६.७९५.१४ या नव्या अत्युच्च स्तरावर दिवसाचा शेवट केला. प्रारंभीच्या सत्रात तो ४१७ अंशांनी उसळून ६७,००७.०२ या दिवसांतर्गत नवीन शिखरावर पोहोचला होता. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकही ३७.८० अंशांनी (०.१९ टक्के) वाढून १९,७४९.२५ या सार्वकालिक उच्च पातळीवर बंद झाला. दिवसभरात, निफ्टीनेही १९,८१९.४५ या अत्युच्च शिखर गाठले होते.

आणखी वाचा-गेल्या १५ दिवसांत DIIs ची १०,००० कोटी रुपयांहून अधिकची विक्री

सेन्सेक्समध्ये सामील समभागांमध्ये, इन्फोसिसने सर्वाधिक ३.६७ टक्क्यांनी झेप घेतली. एशियन पेंट्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, विप्रो, एनटीपीसी, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह आणि लार्सन अँड टुब्रो हे अन्य वधारलेले प्रमुख समभाग होते. त्या उलट स्टेट बँक, बजाज फायनान्स, टायटन, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट हे समभाग घसरणीत राहिले.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निरंतर सुरू राहिलेला डॉलर-पौंडाचा दमदार प्रवाह हा स्थानिक बाजारातील निर्देशांकांमधील अत्युच्च तेजीमागील प्रमुख प्रेरक शक्ती आहे. बाजार जरी सध्या अतिखरेदीच्या क्षेत्रात पोहोचला असला तरी, भारताच्या मजबूत आर्थिक कामगिरीमुळे आणि अमेरिकेतील नरमलेली चलनवाढ पाहता तेथील व्याजदर वाढीचे चक्र संपुष्टात येण्याच्या आशेने बाजाराचा एकंदर तेजीपूरक कल कायम आहे, असे कोटक सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख श्रीकांत चौहान यांनी मत नोंदवले. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास, नजीकच्या भविष्यात बाजारात काही निवडक क्षेत्र आणि समभागांपुरती हालचाल सुरू राहण्याची शक्यता आहे, असे मंगळवारी दिवसांतंर्गत दिसून आलेले चढ-उतार देखील सूचित करतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

आणखी वाचा-१९ वर्षांनंतर टाटांचा IPO येणार, शेअर्स खरेदीसाठी गर्दी, ग्रे मार्केटमध्ये दर गगनाला भिडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अस्थिरतेचे ग्रहण आणि नफावसुलीही

डॉलर निर्देशांकातील झपाट्याने घसरण आणि अमेरिकेच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांमधील घसरण ही भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमधील गुंतवणुकीच्या प्रवाह आणि तरलतेला आधार देत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेमधील वाढीची निराशाजनक आकडेवारी आणि अमेरिकेसंबंधी बळावलेल्या आशावाद देखील विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांच्या भारतीय बाजारपेठेकडील ओढा वाढवण्याचे कारण बनले आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी निरीक्षण नोंदवले. यापरिणामी स्थानिक बाजारात तेजीवाला ‘बैल’ चौखूर उधळत नवनवीन उंची गाठत चालला आहे. परंतु यातून बाजाराच्या मूल्यांकनाबाबत चिंताही वाढत चालली आहे. याच चिंतेतून दिवसाच्या उत्तरार्धात बाजारात अस्थिरताही दिसून आली, असे ते म्हणाले. या अस्थिरतेचे प्रतीक म्हणजे व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक हे अनुक्रमे ०.४७ टक्क्यांनी आणि ०.१८ टक्क्यांनी मंगळवारी गडगडले.